कोल्हापूर: कोल्हापूरचे युवा कलाकार आणि दिग्दर्शक उमेश बोळगे यांनी सत्य घटनेवर आधारित अ आ इ ई या लघुपटाची निर्मिती केली आहे.उमेश बोळगे यांनी या २७ मिनिटाच्या लघुपटात अपंगांचे भावविश्व त्यांना समाजाकडून मिळणारी उपेक्षा या सर्वांचा उलघडा केलेला आहे.उद्या शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ६ वाजता या लघुपटाचे सादरीकरण केले जाणार आहे.सामाजिक आणि ज्वलंत विषय,योग्य मांडणी,सत्य घटनेवर आधारित कथानक आणि नवोदित कलाकारंचा दमदार अभिनय यामुळे हा लघुपट लोकांना नक्कीच आवडेल असे दिग्दर्शक उमेश बोळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोल्हापूरला कलापूर म्हटले जाते.पण सध्या या मातीत चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करणारे निर्माते,दिग्दर्शक,आणि कलाकार अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेही राहिलेले नाहीत.यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे अशी खंतही उमेश बोळगे यांनी व्यक्त केली.या मातीतून निर्माण झालेले कलाकार,तंत्रज्ञ देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवतात.हीच परंपरा जोपासत उमेश बोळगे यांनी हा लघुपट बनवला आहे.या लघुपटाची कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन उमेश बोळगे यांचे असून मुख्य भूमिकेत संगमेश पाटील,नम्रता शिंदे,स्नेहा बिरंजे,मीनाक्षी हंडे,एन.डी.चौगले आहेत.अनेक मराठी हिंदी चित्रपट,मालिका यातून आपली छाप उमटवणारे उमेश बोळगे यांनी अ आ इ ई च्या निमित्ताने दिव्यांग लोकांचे विश्व समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.उद्या या लघुपटाचा प्रीमियर होणार असून दिव्यांग असून आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.तरी रसिक प्रेक्षकांनी याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संपूर्ण टीमने केले आहे.पत्रकार परिषदेस कलाकार,कॅमेरामन निलेश जाधव,सुरेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply