
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा हा महसूल मंत्र्यांचा जिल्हा असून हा जिल्हा महसूल प्रशासनात राज्यात आदर्श निर्माण करेल यासाठी प्रयत्न करणार असून त्यामध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांची साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यात महसूल विभागात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी, अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी हे अधिकाऱ्यांचे अविभाज्य घटक असून कोल्हापूर जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी हे अतिशय चांगले व खुप लवकर शिकणारे आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण प्रारुप तयार करण्यात येईल व त्यंाना आवश्यकतेनुसार ट्रेनिंग देण्यात येईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी आपण कोणत्याही क्षणी उपलब्ध असल्याचे सांगून पुरपरिस्थिती उत्तम रितीने हातळल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंद केले.
यावेळी 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह महिला खातेदारांवर केंद्रीत असल्याने त्यांनी यावेळी वर्किंग वुमेन्सचे विशेष आभार मानले. विशेष निष्ठा आणि प्रामाणिकतेने काम करण्यात महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षाही अधिक आहे, असे सांगून घर आणि कार्यालय या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी स्वत:च्या आरोग्याची काळजीही घ्यावी, असा अपूलकीचा सल्ला दिला.
अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी हे अतिशय कणखर असतात. माणसे ओळखण्याचा गुण त्यांच्यात चांगला असतो, असे सांगून प्रत्येकाने आपला एक्सपर्ट एरिया तयार करावा. संगणकाचे अद्ययावत ज्ञान असल्याशिवाय प्रशासनाला गती येणार नाही त्यामुळे प्रत्येकाने अद्ययावत संगणक ज्ञान आत्मसात करावे. महसूल मंत्री या जिल्ह्याचेच असल्याने या विभागाची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जनतेशी सौहार्दाने वागावे.
Leave a Reply