ऍमस्टरडॅम येथे होणाऱ्या फिल्म लॅबसाठी मयूर कुलकर्णींची निवड

 

Press printकोल्हापुर :एनएफडीसी’ने (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) व ‘डच कल्चरल सेंटर’ सहयोगाने नेदरलॅन्ड्समधील ‘सिनेकिड’ या कौशल्य विकास कार्यक्रम राबवणाऱ्या जगातील नामांकित संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या फिल्म बझार ‘चिल्ड्रन्स स्क्रीनरायटर्स लॅब’ साठी देशातून केवळ सहा जणांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरातील कलाकार व ‘भवताल’ सारखी लक्षवेधी शॉर्टफिल्म देणार्या मयूर प्रकाश कुलकर्णी या फिल्मेकरची यामधे निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ते लवकरच या लॅबसाठी ऍमस्टरडॅमला रवाना होत आहेत.
मयूर यांची कथा, पटकथा, संवाद असणाऱ्या ‘द गर्ल ऍन्ड ऑटोरिक्शा’ या चित्रपट प्रकल्पाची निवड विशेष निवड प्रक्रियेद्वारे मान्यवर परीक्षकांकडून करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शनही तेच करणार असून तत्पूर्वीच त्यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे यापुढील प्रवास लक्षवेधी ठरणार आहे. निवड झालेल्यांपैकी चार हिंदी, एक तमिळ तर मयूर कुलकर्णी हे एकमेव मराठी नाव व एकमेव मराठी पटकथा आहे. त्यामुळे बदलत्या मराठी चित्रपटांच्या जागतिक यशाच्या वाटचालीत या पटकथा निवडीने आश्वासक भर पडत आहे.
‘चिल्ड्रन्स स्क्रीन रायटर्स लॅब’च्या सत्रांपैकी एक महत्त्वाचे सत्र ऍमस्टरडॅममध्ये ऑक्टोबर महिन्यात होत आहे आणि त्याच दरम्यान तेथे होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या बालचित्रपटांपैकी एक असणाऱ्या ’३० व्या सिनेकीड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे विशेष आमंत्रित म्हणून त्यांना मान मिळाला आहे.
चार ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांची प्रमुख व्यक्तिरेखा असणाऱ्या व मूलत: भारतीय संकल्पना, पर्यावरण व त्या वयाच भावविश्व मांडणाऱ्या चित्रपटांची निर्मिती व्हावी या उद्देषाने चित्रपट उद्योगात नवं काही करू पाहणाऱ्या तरूण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी या चिल्ड्रन्स स्क्रीन रायटर्स लॅबचे आयोजन करण्यात आले आहे. एनएफडीसीच्या स्क्रीन रायटर्स लॅबकरिता भारतभरातून दरवर्षी ४५० च्या वर प्रकल्प सहभागी होतात. या लॅबकरिता कथेचा दर्जा व लेखकाची क्षमता पाहून पहिल्या फेरीसाठी १२ कथांना नामांकित करण्यात आले. दुसऱ्या फेरीकरिता संपूर्ण पटकथा मागविण्यात आल्या व त्यांच्या आवलोकानातून अंतिम सहांची निवड करण्यात आली.
लॅबमध्ये मेंटॉर म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरी बजावणारा तिज्स वॅन मार्ले आणि ज्यो लेईन लार्मन व सिस्के कॉक यांचे मार्गदर्शन मयूर कुलकर्णी यांना मिळणार आहे. या पैकी मार्ले हा २०१४ मध्ये ऑस्करच्या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या ‘अक्यूज्ड’ या चित्रपटाचा लेखक आहे. तर लार्मन ही मानाच्या कान्स पुरस्कार विजेत्या ‘काऊबॉय’ या चित्रपटाची लेखिका आहे. सिस्के कॉक हिने ‘टनेल व्हिजन’ सारख्या टेलीफिल्मचे लेखन केलेले होते.
मयूर यांची निर्मिती असणाऱ्या ‘भवताल’ तसेच ‘ओरिजिन’ या सारख्या लघुपटांची दखल विविध पुरस्कारांसह सॅन फ्रान्सिस्को, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जयपूर, भुवनेश्वर, गोवा आदी ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आवर्जून घेण्यात आली. या दोन्ही लघुपटांसाठी संकल्पना, दिग्दर्शन, पटकथा अशा अनेक बाबी मयूर कुलकर्णी यांनी स्वत: हाताळलेल्या होत्या. व्हिज्युअल आर्ट, ऍडव्हर्टायजिंग. कॉपीरायटिंग, ग्राफिक डिझाईन, आर्ट डिरेक्शन व कॅलिग्राफी या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे मयूर कुलकर्णी हे कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे संचालक तर गहिवर फाऊंडेशनचे संस्थापक संचालकही आहेत. पर्यावरण क्षेत्रातील योगदानासाठी मयूर कुलकर्णी यांना वसुंधरा गौरव किर्लोस्कर ग्रुप कडून प्राप्त झालेला आहे. या खेरीज भारत सरकार, महाराष्ट्र शासन व व्यावसायिक कामांकरिता कलाक्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.
आता या आंतरराष्ट्रीय स्क्रीन रायटर्स लॅबसाठी त्यांची निवड झाल्याने कोल्हापूरच्या कलापरंपरेत एक मानाचा तुरा खोचला जाण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिगत कारकीर्दीतही एक महत्त्वाचे पुढचे पाऊल पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!