
मुंबई : स्त्री कर्तृत्वाविषयीची जाणीव ठेवत त्यांच्या कार्याची केवळ दखलच घेणारा नाही तर त्यांना सन्मानित करणा-या या सोहळ्यात सहभागी होऊन स्वाती साठे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महिलेचा सन्मान करण्याचं भाग्य मला मिळालं. कारागृहातील कैद्यांना कडक शिस्तीसोबतच मायेचा ओलावा देण्याचं काम स्वाती साठे आजवर करत आल्या आहेत. त्यांचा सन्मान करता येणं हा मी माझा सन्मान समजतो अशी हृद्य भावना राज्याचे गृहराज्यमंत्री मा. दीपक केसरकर यांनी झी मराठीच्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’सोहळ्यात व्यक्त केली. डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात येरवाडा कारागृहाच्या उप महा निरीक्षक स्वाती साठ्येंसह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.येत्या २८ ऑगस्टला सायंकाळी ७ वा. हा पुरस्कार सोहळा झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.
विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या कितीतरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. परंतु त्यांच्या कामाची दखल प्रत्येक वेळी घेतली जातेच असे नाही. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. यंदा या पुरस्काराचं हे चौथं वर्ष आणि याही वर्षी समाजकारण, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, अशा विविध क्षेत्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या कर्तृत्वशालिनींचा गौरव करण्यात आला. ज्यामध्ये पर्यावरण क्षेत्रासाठी उषा मडावी, आरोग्या आणि विज्ञान क्षेत्रासाठी डॉ. स्मिता लेले, सामाजिक क्षेत्रासाठी प्रीती पाटकर आणि स्वाती साठ्ये, क्रीडा क्षेत्रासाठी तारामती मतीवाडे, कृषी क्षेत्रासाठी कविता जाधव बिडवे यांचा गौरव करण्यात आला. यासोबतच गृहीणींच्या आरोग्यापासून ते ग्रामविकासाचे व्रत घेऊन झटणारे आणि उंब-याच्या आतील विकासासोबतच उंब-याबाहेरचाही विकास करणारे डॉ. हर्षदा आणि डॉ. प्रसाद देवधर या दाम्पत्याच्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेचाही सन्मान या सोहळ्यात करण्यात आला.
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या पुनर्वसनासाठी गेली चार दशके अथक परिश्रम घेणा-या नसीमा हुरझूक यांना यंदाच्या उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
Leave a Reply