
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातील 8 नगरपालिका हागणदारी मुक्त केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांच्याहस्ते जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. केंद्र शासनाने देशातील 10 शहरे हागणदारी मुक्त घोषित केली असून त्यात महाराष्ट्रातील 5 आहेत. राज्यातील या 5 शहरांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, मुरगूड व पन्हाळा या तीन शहरांचा समावेश असल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांचे कौतुक करण्यात आले.
राज्य शासन व एन.डी.टी.व्ही यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात महाक्लीनीथॉन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, एन.डी.टी.व्ही.चे प्रादेशिक संचालक नितीश कपूर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या प्रभावी जनजागृती बरोबरच प्रत्यक्षपणे स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचे कौतुक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले, व्यक्तीगत वातावरण स्वच्छ राहिल्यास त्याचा परिणाम परिसरावरही होतो. प्रत्येकाने आपल्या घराबरोबरच घराच्या परिसरातील 10 फुट परिसर स्वच्छ केला तरी संपूर्ण शहर स्वच्छ होईल. व्यक्तीगत स्वच्छेतून देश स्वच्छ होईल.
स्वच्छ भारत अभियान या महत्वाकांक्षी अभियानात लोकसहभाग महत्वाचा असून लोकांचा विशेषत: महिलांचा सकारात्मक उत्स्फुर्त सहभाग आहे, असे गौरवोदगारही अमिताभ बच्चन यांनी काढले.
Leave a Reply