
मुंबई : मराठी मनोरंजनाच्या दुनियेत आपल्या प्रेक्षकांना सातत्याने नवनवीन दर्जेदार कार्यक्रम देणा-या झी मराठी वाहिनीने या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी आणली आहे एक विशेष भेट ‘झी मराठी अॅप’…मोबाईल फोनवरील मनोरंजन ही आता नव्या पिढीची भाषा आणि गरज बनली आहे. स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या या जगात मनोरंजनाचे नवनवे पर्याय उपलब्ध होत आहेत. हाच नवा प्रवाह लक्षात घेऊन झी मराठीनेही आपले स्वतःचे नवे अॅप प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. गणेशचतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर या अॅपचा श्री गणेशा होणार असून गुगल प्ले स्टोअर वरुन हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. याची आयओएस आवृत्तीही लवकरच उपलब्ध होणार आहे. याशिवाय9595164164 या क्रमांकावर फ्री मिस्ड कॉल देऊनही हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येईल.‘आता प्रत्येक क्षण मराठीपण’ अशी टॅगलाइन असलेल्या या अॅप मध्ये वापरकर्त्यांसाठी अनेकविध गोष्टी उपलब्ध आहेत. झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या मालिकांचे मोबिसोड यावर बघायला मिळतील. झी मराठीच्या विविध सोहळ्यांतील गाजलेले परफॉर्मन्स, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील विनोदी प्रहसने, ‘आम्ही सारे खवय्ये’मधील विशेष पाककृती असा खजिना इथे उपलब्ध असेल. याशिवाय काही खास गोष्टी ज्या इतर ठिकाणी नसतील त्यासुद्धा इथे बघायला मिळतील. विशेष म्हणजे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सारख्या गाजलेल्या लोकप्रिय मालिकांचे भागही यावर उपलब्ध असतील.या अॅपमध्ये विविध विभाग बघायला मिळतील ज्यात‘अस्सल मराठीपण’, ‘माZee मराठी’ सारख्या विभागांत विनोद, कला, संस्कृती, साहित्य याच्याशी संबंधित चित्रफितरहित गोष्टी (नॉन व्हिडीओ) बघायला मिळतील.जगभरात जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहे तिथे झी मराठी वाहिनी पोहोचलेली आहे. या अॅपच्या माध्यमातून या वाहिनीचे कार्यक्रम आता प्रेक्षकांसाठी प्रत्येक क्षणी उपलब्ध असतील. यामुळेच प्रत्येक क्षण मराठीपणाचा आनंद त्यांना घेता येईल.
Leave a Reply