
नवी दिल्ली : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील जवळपास दिडशे वर्ष जुन्या शिवाजी पुलास समांतर असणा-या पुलाचे थांबलेले बांधकाम सुरु करण्यासाठी केंद्र शासन येत्या 2दिवसात अधिसूचना काढणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी दिली. परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षेत शिवाजी पुल प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडीक यांच्यासह केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर ‘शिवाजी पूल’ हा जवळपास दिडशे वर्ष जुना पूल आहे. हा पूल वाहतुकीसाठी योग्य नसल्याने त्याच्या शेजारीच समांतर पूल बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतले आहे. मात्र, या भागात प्राचीन अवशेष असल्याचे सांगून काही सामाजिक संस्थांनी पुरातत्व विभागाकडे हे बांधकाम थांबविण्याची मागणी केली होती. त्यामुळे पुरातत्व विभागाने या बांधकामावर बंदी आणली होती.
आजच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्यावतीने पुलाच्या भागातील प्रत्यक्ष चित्र मांडणारे सादरीकरण करून या जागेत कोणतेही प्राचीन अवशेष नसल्याचे सांगण्यात आले. तसेच,हा पुल जुना झाला असून वाहतूक सुरुच राहिल्यास मनुष्य हानी होऊ शकते तसेच चार जिल्ह्यांना जोडणारा शिवाजी पूल या भागातील महत्वाचे संपर्क साधन असल्याची बाब मांडण्यात आली. या सर्व बाबींचा विचार करून येत्या दोन दिवसात शिवाजी पुलाला समांतर पुलासंदर्भात अधिसूचना जारी करणार असल्याचे डॉ. महेश शर्मा यांनी या बैठकीत सांगितले. तसेच, येत्या सात दिवसात कॅबीनेटपुढे हा विषय मांडून बंद पडलेल्या पुलाचे काम सुरु करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात येईल, असे डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply