
कोल्हापूर : जाहिरात संस्था म्हणजे संशोधन संस्था बनल्या आहेत. केवळ कल्पना नाही तर मोठा अभ्यास जाहिरात मांडताना करावा लागतो. संवेदनशीलता असणाऱ्या व्यक्ती या क्षेत्रात यशस्वी बनू शकतात असे मत निर्मिती जाहिरात संस्थेचे अनंत खासबारदार यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित “मतदार जनजागृती मोहीम आणि माध्यमांची भूमिका” दोन दिवशिय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. निशा पवार यांनी अनंत खासबारदार यांचा विद्यापीठाचे बोधचिन्ह देऊन स्वागत केले. त्यानंतर कार्यशाळेचे आयोजन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.
राजकीय जाहिरातीविषयी खासबारदार म्हणाले कि, जाहिरात तयार करताना भाषिक ज्ञान, सांस्कृतिक वारसा, स्थानिक समस्या, जाहिरातदाराचे कार्य, जाहिरातदाराची प्रतिमा याचा अभ्यास करावा लागतो. इंदिरा गांधीच्या ‘गरिबी हटवा’ ते नरेंद्र मोदींच्या ‘अब कि बार…’ या संकल्पना जाहिरातींमुळेच सर्वसामान्यापर्यंत सहज पोहचवता आल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जाहिराती मतपरिवर्तन करण्याचे प्रभावी माध्यम बनू शकतात. पक्ष्याची, नेत्यांची, बाजू भक्कमपणे मांडू शकतात’.
बदलत्या काळानुसार रेडिओ, टी.व्ही., वृत्तपत्रांबरोबारच सोशल मेडिया हे प्रभावी माध्यम बनले आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय लोकांपर्यंत नेण्याचे काम जाहिराती करतात. जाहिरात क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी संवेदनशीलता जपण्याचे आवाहन केले.
दुपारच्या सत्रात रेडीओ वरील राजकीय जाहिराती या विषयावर बोलताना, भरत दैनी म्हणाले, ‘बदलत्या तंत्रज्ञनाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम झाला असून जे आहे ते दाखवण्यासोबातच जे नाही ते हि दाखवण्याची ताकत जाहिरातीत आहे’. या प्रसंगी त्यांनी विविध राजकीय जाहिराती विद्यार्थ्यांना दाखवून त्यांची निर्मिती प्रक्रिया समजावून सांगितली.
तिसर्या सत्रात मार्गदर्शन करतांना जगदीश गुरव यांनी विद्यार्थ्यांना सोशल मेडिया साठी तयार कराव्या लागणाऱ्या राजकीय जाहिरातींविषयी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्र संचालन शीतल माने यांनी केले तर डॉ. सुमेधा साळुंखे, चंद्रशेखर वानखेडे, सुनील जाधव, सुधाकर बर्गे यांनी कार्यशाळेच्या अयोजनासाठी परिश्रम घेतले.
Leave a Reply