
कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: लोकशाहीमध्ये संसदीय कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाची असून विविध संसदीय आयुधांच्या सहाय्याने तळागाळातील समाजाचे प्रश्न मांडून त्यावर चर्चा घडवून, उपाय शोधण्याचे सर्वोच्च मंदिर आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केले.
केंद्रीयसंसदीय कार्य मंत्रालय (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वी युवा संसद (गट फ) स्पर्धा विद्यापीठाच्याराजर्षी शाहू सभागृहात पार पडली. यावेळी प्रमुख परीक्षक म्हणून महाडिक उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानीकुलगुरु डॉ. देवानंद शिंदे होते.
खासदार महाडिक यांनी आपल्या भाषणात संसदीय कार्यप्रणालीमधील तांत्रिक बाबी, लोकशाहीमधील तिचे महत्त्व याविषयीचे आपले अनुभव सांगत अतिशय सोप्या भाषेत विश्लेषण केले. ते म्हणाले, प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर चर्चा अथवा लक्षवेधी सूचना आदी अनेक आयुधांच्या सहाय्यानेच लोकप्रतिनिधीला सभागृहात आपले म्हणणे मांडावे लागते. त्याच्या वाट्याला नियमानुसार वेळेची मर्यादाही असते. या सर्व मर्यादा सांभाळून आपले म्हणणे नेमकेपणाने व अचूकपणाने मांडण्याचे कौशल्य लोकप्रतिनिधीकडे असले पाहिजे. तसेच, त्यासाठी देश-विदेशांतील ताज्या घडामोडींचे ज्ञान अवगत करण्याबरोबरच आपल्या समाजातील, मतदारसंघातील प्रश्नांची माहितीही असायला हवी. गेल्या दोन वर्षांत मोठ्या मेहनतीने आपण हे कौशल्य अंगी बाणवले असून त्यामुळेच माझ्या कामकाजाचा ठसा संसदेत अल्पावधीत उमटविता आला, असे त्यांनी सांगितले.
Leave a Reply