
नांदेड: मराठा समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये आज (रविवारी) विराट मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे.कालच मराठा समाजाच्या वतीने हिंगोलीमध्ये विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये असंख्य तरुण-तरुणी, पुरुष आणि महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली. यापूर्वीही औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी या जिह्यांमध्ये या मराठा समाजाच्या मोर्चाला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर आज नांदेडमध्ये या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रविवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक या मोर्चात सहभागी झालेत. यामुळे सगळ्यांचं लक्ष या मोर्चाकडे लागलं आहे.
या मोर्चामध्ये कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशा मागण्या या मोर्चादरम्यान करण्यात येत आहेत.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे ही या मराठा मोर्चात सहभागी झालेत, नेता म्हणून नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून या मोर्चात सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Leave a Reply