
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवारी) पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात 4 दहशतवादी मारले गेले आहेत. यात 8 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर लष्कराच्या विशेष कमांडोंनी मुख्यालयाचा ताबा घेतला असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. हल्ल्यांमागे लष्कर ए तोयबा आणि आयएसआयचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे.
नियंत्रण रेषेला लागून असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला दहशतवाद्यांनी पहाटे लक्ष्य केले. गोळीबार करतानाच दहशतवाद्यांनी हँडग्रेनेडही फेकले. पहाटे 5.30 वाजल्यापासून चकमक सुरू आहे. त्यात लष्कराच्या 17 जवानांना जीव गमवावा लागला. तर, लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. पठाणकोट हल्ल्याइतकाच भीषण आणि मोठा हल्ला असल्याचं बोललं जातं आहे.
Leave a Reply