कोल्हापूर: सप्टेंबर महिना हा युथ महिना म्हणून साजरा केला जातो यानिमित्त युवा वर्गाला मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केले जातात.या उपक्रमांतर्गत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीच्या वतीने येत्या रविवारी २५ सप्टेंबर रोजी उडाण या संकल्पनेखाली न्यु जनरेशन डीस्ट्रीक्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी ही कॉन्फरन्सचे आयोजन रोटरीच्या विविध डीस्ट्रीक्ट मध्ये करण्यात येते.यावर्षी हा मान कोल्हापूरला मिळाला आहे.२५ तारखेला सकाळी ९ ते 2 यावेळेत राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभाग्गृहात संपन्न होणार आहे.अशी माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष शाम कोरगावकर आणि इव्हेंट चेअरमन राजेंद्र बेंद्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.यासाठी महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा येथून सुमारे 1 हजाराहून अधिक युवक आणि युवती सहभागी होणार आहेत.आत्तापर्यंत बहुतेक नोंदणी पूर्ण झालेली आहे.असेही ते म्हणाले.
बदलत्या परिस्थितीनुसार युवकांना कौशल्ये प्राप्त व्हावीत आणि युवकांच्या अंगी उद्योजकीय गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक कलागुणांचाही अंतर्भाव व्हावा,य हेतूने रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी यांच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविला जातो.कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते होणार असून त्यांचे मेक इन इंडिया,स्कील इंडिया आणि करिअर डेव्हलपमेंट या विषयावर बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.त्यांनतरच्या सत्रात रोटरी डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ.विनय पै रायकर,मार्व्हलस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संग्राम पाटील,उद्योजक सुहास साजणे,गोव्याचे माजी रोटरी गव्हर्नर जॉन्सन फर्नांडीस हे युवकांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.असे रोटरीचे माजी गव्हर्नर श्रीनिवास मालू यांनी सांगितले.या परिषदेत युवकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.आजच्या युवापिढीला या परिषदेत मार्गदर्शन तर मिळणारच आहे त्याच बरोबर आपले कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची मोलाची संधी युवकांना मिळणार असल्याचे सचिव जयंत नार्लेकर यांनी सांगितले.यातील सहभाग विनामुल्य असून याचा फायदा युवा पिढीला नक्कीच होईल असे श्रीनिवास मालू यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे पदाधिकारी,आणि रोटेरियन उपस्थित होते.

Leave a Reply