
कोल्हापूर: जिल्ह्यात मुद्रा योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यात 73 हजार 981 लाभार्थ्यांना 396 कोटी 45 लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. मुद्रा योजनाही रोजगार, स्वयरोजगार निर्मितीशी संबधित योजना असल्याने ही योजना समाजातील तळागाळात, ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात पोहचावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिले.
मुद्रा बॅंक योजनेचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा यासाठी या योजनेच्या प्रचार, प्रसार व समन्वय करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एम.जी.कुलकर्णी, एस. जी. किंणिगे, नाबार्डचे नंदू नाईक, जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव वर्षा पाटोळे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वाय. पी. पारगावकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या मंजुषा चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील होतकरु तरुणांना मुद्रा योजनेद्वारे अर्थ सहाय्य देण्यास बँकांनी सक्रीय व्हावे, असे निर्देश देऊन या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करताना कोणत्याही बँकेने को-सिक्युरेटी लेटर घेऊ नये अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिल्या. राज्यात मुद्रा बँक योजनेअंतर्गत 13 लाख 35 हजार 766 लाभार्थ्यांना 5 हजार 659 कोटी 78 लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 73 हजार 981 लाभार्थ्यांना 396 कोटी 45 लाख अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये 10 हजार ते 50 हजार पर्यंतच्या अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या शिशुगटामध्ये 68 हजार 772 लाभार्थ्यांना 154 कोटी 35 लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 50 ते 5 लक्ष पर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या किशोर गटामध्ये 2 हजार 955 लाभार्थ्यांना 73 कोटी 19 लाख अर्थसहाय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 5 लक्ष ते 10 लक्ष रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या तरुण गटामध्ये 2 हजार 294 लाभार्थ्यांना 168 कोटी 91 लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांची जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपब्ध करुन देण्यावर शासनाचा भर आहे. असे सांगून या योजनेतील यशकथा शोधून त्यांना व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिले.
Leave a Reply