सांगली : अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातर्फे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम आखून जिल्ह्यामध्ये खाद्यतेल / वनस्पतीचे एकूण 18 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या कारवाईत पुनर्वापर केलेले खाद्यतेलाचे डबे आढळल्याने व कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून चार ठिकाणी 8 लाख 65 हजार 314 रूपये किंमतीचा 10 हजार 110 किलोचा साठा जप्त करण्यात आला. तसेच धने व मिरची पावडरचे नमुने घेऊन लेबल तरतूदीचा भंग व उत्पादकाचा पत्ता चुकीच्या टाकणे या कारणास्तव 9 हजार 920 रूपये किंमतीचा 31 किलो साठा जप्त करण्यात आला. ही माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगिरे यांनी दिली.
श्री. कोडगिरे म्हणाले, मिठाई उत्पादकाकडून मिठाईचे 4, उत्पादक व ठोक विक्रेत्याकडून दुधाचे व दुग्धजन्य पदार्थाचे 6 व इतर 15 नमुने घेण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल. तयार फराळ विक्रेते यांच्याकडूनही अन्नपदार्थाच्या दर्जावरती देखरेख ठेवण्यासाठी तपासण्या करून नमुने घेण्यात येणार आहेत. याकरिता 7 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे.
तयार फराळ, मिठाईची खरेदी करताना नागरिकांनी परवानाधारक विक्रेत्याकडून व परिपूर्ण लेबल असलेले अन्नपदार्थ जसे उत्पादकाचा पूर्ण पत्ता, समुह क्रमांक, वापरयोग्य कालावधी, व्हेज मार्क इत्यादी बाबींची पडताळणी करूनच खरेदी करावी व खरेदी बिल घ्यावे. जितकी आवश्यकता आहे तितकीच व मिठाई ताजी असल्याचे पडताळून खरेदी करावी. अन्नातील दर्जाबाबत काही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कोडगिरे यांनी केले आहे.
Leave a Reply