
कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीकडून सन्माननीय सदस्य (फेलो) म्हणून निवड करण्यात आली आहे. अकादमीमार्फत डॉ. एस. आर. यादव यांना त्यांच्या बहुमुल्य वनस्पती शास्त्रातील संशोधनाची दखल घेत हा सन्मान दिला आहे. अकादमीकडून त्यांना सन्मानाचे नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. डॉ. यादव यांनी वनस्पती संशोधनामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी आजवर केलेल्या संशोधनामध्ये अनेक दुर्मिळ व नवनवीन प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांनी आजतागायत शिवाजी विद्यापीठासाठी महत्वकांक्षी प्रकल्प राबविले असून त्यातून नवीन संशोधनात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच अग्रणीय वनस्पती उद्यानाची (लीड बोटॅनिकल गार्डन) स्थापना विद्यापीठात करून वनस्पतीशास्त्रातील संशोधनाची वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यांच्या संशोधनामुळे वनस्पतीशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहोचले आहे.
संशोधनाव्यतिरिक्त वनस्पतींचे अस्तित्व आणि महत्व तसेच पश्चिम घाटाचे संवर्धन याविषयी जनजागृती व प्रबोधन ते करत असतात. त्यांनी पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पतींचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी योगदान दिले आहे. अकादमीच्या या सन्मानामुळे शिवाजी विद्यापीठाला संशोधन आणि जागतिक स्तरावर लौकिक प्राप्त झाला आहे. अकादमीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणून निवड झालेले विद्यापीठातील ते एकमेव प्राध्यापक व शास्त्रज्ञ आहेत.
Leave a Reply