
कोल्हापूर : नवी दिल्ली येथे झालेल्या चौथ्या ‘दिल्ली शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल-२०१५’मध्ये लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या ‘स्मोकिंग झोन’ या लघुपटाला परीक्षकांकडून देण्यात येणाऱ्या ‘स्पेशल मेन्शन-ज्युरी’ पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट संगीतासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेल्या १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलमध्ये हा चित्रपट महोत्सव पार पडला. या महोत्सवामध्ये ‘स्मोकिंग झोन’ला एकूण पाच नामांकने मिळाली होती. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट-ज्युरी, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (अनुप जत्राटकर), सर्वोत्कृष्ट अभिनेता (गुरूराज अवधानी) आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल संगीत (कॅटॅस्ट्रॉफिक डिसइंटिग्रेशन बँड) अशी नामांकने मिळाली होती. त्यापैकी परीक्षकांकडून देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार ‘स्मोकिंग झोन’ला जाहीर झाला. त्याचप्रमाणे ‘स्मोकिंग झोन’साठी ‘ओ रे बंजारे..’ हे गीत संगीतबद्ध करणाऱ्या मुंबईच्या ‘कॅटॅस्ट्रॉफिक डिसइंटिग्रेशन’ या रॉक बँडला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल संगीतासाठीचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. या रॉक बँडमध्ये नंदकिशोर कुमावत, कुणाल, प्रतीक, लेनिन आणि नेल्सन यांचा समावेश आहे. कोल्हापूरचे रवींद्र सुतार पार्श्वसंगीतकार आहेत.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या संकल्पनांचा आजच्या तरुणाईच्या परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यातून वेध घेणाऱ्या ‘स्मोकिंग झोन’मध्ये ज्येष्ठ अभिनेते गुरूराज अवधानी यांच्यासह रणजीत गायकवाड, श्रेया कोलप, संतोष कांबळे, रसिका कुलकर्णी आणि प्रणौती फुटाणे यांच्या भूमिका आहेत. लघुपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांनी केले आहे. रणजीत गायकवाड व रवींद्र सुतार हे सहनिर्माते; तर चैतन्य गुजर कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती व्यवस्थापक म्हणून रणजीत माने यांनी तर निर्मिती समन्वयक म्हणून नितीन माळगे यांनी काम पाहिले आहे. कला-दिग्दर्शन सुंदर कुमार ऊर्फ एसके यांनी केले आहे. लघुपटाचे संकलन रवींद्र सुतार यांनी केले आहे. माधव सुतार प्रोडक्शन डिझाईनर आहेत.
Leave a Reply