
केंद्रच्या ‘ग्यान’ प्रकल्पात विद्यापीठाचे तीन प्रस्ताव मंजूर;देशातील वीस विद्यापीठात समावेश
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नूतन व अभिनव अशा ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स’ (GIAN- ग्यान) या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या तीन प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. दहा दिवसांपेक्षाही कमी इतक्या विक्रमी वेळेत प्रस्ताव मंजूर झाल्याने विद्यापीठातील संशोधकांचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
केंद्रीय उच्चशिक्षण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांच्या ज्ञानाचा लाभ सार्वजनिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनाही व्हावा, या हेतूने ‘ग्यान’ उपक्रमाची घोषणा केली. आयआयटी, आयआयएम, आयसीईआर, एनआयआयटी यांच्यापलीकडे देशातील विविध सार्वजनिक विद्यापीठांसाठी विशेषत्वाने ‘ग्यान’ असेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठांचे ‘नॅक’ मानांकन, त्यांचे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आदी निकषांवर पहिल्या टप्प्यात देशातील वीस विद्यापीठांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दि. २२ सप्टेंबर रोजी इ-मेलद्वारे या उपक्रमात सहभागाविषयी भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) माहिती प्राप्त झाली. त्यांनी लगोलग सर्व विभाग प्रमुखांना ती ई-मेल पाठविली. याला प्रतिसाद मिळून विद्यापीठामार्फत एकूण नऊ प्रस्ताव ‘ग्यान’ प्रकल्पासाठी सादर झाले. आयआयटी (खरगपूर) ‘ग्यान’ प्रकल्पासाठी नोडल संस्था म्हणून काम पाहात आहे. २८ सप्टेंबरला दिल्ली येथे झालेल्या बैठकीत त्यापैकी ३ प्रस्तावांना हिरवा कंदील मिळाला आहे. उर्वरित प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी प्राप्त विद्यापीठाला मंजूर झालेले अभ्यासक्रम आणि परदेशी तज्ज्ञ मार्गदर्शक पुढीलप्रमाणे: १. कॅन्सर ॲन्ड न्युरॉलॉजिकल नॅनो-टेक्नॉलॉजी: फ्रॉम बेसिक टू ट्रान्सलेशनल ॲन्ड क्लिनिकल सायन्सेस, तज्ज्ञ मार्गदर्शक: फ्रँकॉइस बर्जर, युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनोबल, फ्रान्स (होस्ट फॅकल्टी: प्रा. आर.के. कामत व प्रा. पी.एस. पाटील), २. इव्हॉल्युशन मॉर्फोलॉजी ऑफ लॅन्ड प्लँट्स, तज्ज्ञ मार्गदर्शक: दीमित्री सोकोलॉफ लोमोनोसोव्ह, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया (होस्ट फॅकल्टी: प्रा. एस.आर. यादव), ३. जिऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स फॉर वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट, तज्ज्ञ मार्गदर्शक: प्रा. वेंकटेश मेरवाडे, पर्ड्यु युनिव्हर्सिटी, इंडियाना (होस्ट फॅकल्टी: डॉ. सचिन पन्हाळकर)
Leave a Reply