कोल्हापूर : ग्रामपंचायतींनी विविध योजनेंतर्गत मंजूर घरकुलांसाठी प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी 50 हजाराचे अनुदान शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येते. यापुढे निकषात बसणारे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे सांगून स्वच्छ भारत अभियानामध्ये देशापातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात विविध विकास कामांचा आढावा राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, पक्षप्रतोद शहाजी पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती ज्योती पाटील, समाज कल्याण सभापती किरण कांबळे, बांधकाम समिती सभापती सिमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
इंदिरा आवास योजनेमध्ये 2654 घरकुलांपैकी पहिला हप्ता 2420, दुसरा हप्ता 1839 तर तिसरा हप्ता 928 वितरीत करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन 2016-17 मध्ये 5660 उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्याचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले आहे. रमाई आवास योजनेंतर्गत 2373, शबरी अदिवासी घरकुल मध्ये गतवर्षी 29 आणि यावर्षी 40 इतके उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इंदिरा आवास योजनेमध्ये अद्यापही 390, रमाई आवास योजनेमध्ये 49 तर राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेंतर्गत 19 घरकुलांचे काम अपूर्ण आहे. ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी, असे सांगून दादाजी भुसे यांनी यासाठी ग्रामपंचायतींनी प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश दिले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी 108 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यासाठी आपण पाठपुरावा करु. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती संबंधी जातीच्या दाखल्यांना मुदत वाढ देणे व कर्मचारी भरती आदी धोरणात्मक निर्णयांसाठी स्वत: पाठपुरावा करु असे सांगून येत्या काळात जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता लक्षात घेता आचारसंहितेपूर्वी कामे तात्काळ पूर्ण करा, असे निर्देशही दादाजी भुसे यांनी दिले.
या आढावा बैठकीत आमच गाव आमचा विकास उपक्रम, ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र योजनांमधील कामे, सर्व शिक्षा अभियान, समाज कल्याण विभागाकडील योजना, स्वच्छ भारत अभियान, जनसुविधा योजना, अपंग कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, आरोग्य आदींबाबत सविस्तर आढावा घेतला.
Leave a Reply