दानपेट्या दररोज उघडुन रक्कम बँकेत जमा करण्याचे केंद्र शासनाचे आदेश

 

20161117_113648कोल्हापूर : देशातील ज्या मंदिराच्या दानपेट्यात लाखो रूपये जमा होतात त्या दररोज उघडा आणि त्यातील रक्कम बँकेत जमा करा, असे आदेश केंद्र शासनाने देशातील सर्व देवस्थानांना बुधवारी दिले. केंद्रीय कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि देशातील निवडक 20 जिल्हाधिकार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरन्िंसगद्वारे बैठक घेतली. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, अहमदनगर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी सहभागी झाले. या बैठकीनंतर राज्याच्या विधी व न्याय विभागाने तत्काळ परिपत्रक काढून दररोज जमा होणारे दान, देणगी कोणत्याही परिस्थितीत त्याच दिवशी बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

चलनातून 500 व 1000 च्या जुन्या नोटा रद्द झाल्याने, त्या जागी बदलून देण्यात येणार्‍या नव्या नोटांचा देशभर तुटवडा जाणवत आहे. गेले सलग सहा दिवस पैशांसाठी देशभरातील नागरिक बँकांसमोर रांगा लावून आहेत. बहुतांशी सर्व एटीएम सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. यामुळे देशभर सर्वसामान्य नागरिकांत कमालीचे गोंधळाचे वातावरण आहे. पैसे मिळत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यामुळे नागरिकांनी आपल्या जवळील सुट्टे पैसे व्यवहारात आणावेत, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे.

बँकेत सुट्ट्या पैशांचा प्रचंड तुटवडा आहे, या सर्व पार्श्‍वभूमीवर केंद्र शासनाने देशभरातील देवस्थानांच्या दानपेटीतील रक्कम बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय सचिवालयाच्या वतीने कॅबिनेट सचिवांनी बुधवारी दुपारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्िंसगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला  पशुपतिनाथ, सबरीमाला, तिरूमला आदी देवस्थानांसह महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरची विठ्ठल-रखुमाई, शिर्डीचे साईबाबा या देवस्थानाचे प्रतिनिधी म्हणून कोल्हापूर, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्याचे असे देशभरातील 20 जिल्हाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत देशभरातील देवस्थान जमा होणारी रोकड, त्याचे स्वरूप आदींबाबत आढावा घेण्यात आला. दानपेट्या उघडण्याचा कालावधी कमी करून तो दररोज करता येईल का? याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रारंभी दानपेट्या उघडल्यानंतर त्यातील रोकड बँकेत जमा करण्यास वेळ लागेल. मात्र, त्यानंतर दररोज जमा होणारी रक्कम दानपेटी दररोज उघडून, बँकेत जमा करण्यास भविष्यात अडचण येणार नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. काहींनी दानपेट्यांची संख्या, उपलब्ध कर्मचारी, सुरक्षितता आदींबाबत दररोज दानपेट्या उघडण्यास येणार्‍या अडचणीही या बैठकीत मांडल्या. मात्र, देवस्थानच्या दानपेट्टीत सुट्टे पैसे मोठ्या प्रमाणात असतात. ही रक्कम दररोज बँकेत आली तर सुट्ट्या पैशांचा तुटवडा कमी होण्यास मदत होईल. सुट्टे पैसे उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतील परिस्थितीही निवळण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. या बैठकीनंतर राज्याच्या विधी व न्याय विभागाने तत्काळ राज्यातील सर्व देवस्थानांना दानपेट्या दररोज उघडण्यात याव्यात आणि त्यातील रक्कम काहीही झाली तरी ती बँकेतच जमा करावी, असे आदेश दिले आहेत. विधी व न्याय विभागाचे विधी सल्लागार व सहसचिव राजेंद्र सावंत यांनी हे आदेश सर्व देवस्थानला दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!