
कोल्हापूर : सायकल प्रेमींची आवडती रेस ‘रग्गेड सह्याद्री’ सायकल रेसचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आले आहे. रविवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, सह्याद्रीच्या डोंगर रांगेत ही रेस होणार आहे. तत्पूर्वी सायकलिंग या खेळाच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने कोल्हापूर शहरातून सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता, जुना राजवाडा-भवानी मंडप येथून रॅली निघणार असून यात क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रग्गेडियन क्लबचे आकाश कोरगावकर व उपल शहा यांनी पत्रकार परिषदेत केलेयंदा रग्गेड सह्याद्री सायकल रेसचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.लोकराजा राजर्षी शाहूंनी कोल्हापुरात क्रीडानगरीचा पाया भक्कम केला.त्यांची परंपरा जपण्यासाठी आणि रांगड्या कोल्हापूरचे फिटनेस कल्चर अबाधित राखण्याच्या उद्देशाने रग्गेडियन क्लब ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. क्लबतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यात रग्गेड सह्याद्री, कोल्हापूर रन हाफ मॅरेथॉन, शिवाजीराजे मान्सून ट्रेल रेस, अॅडव्हेंचर कार्निव्हल, ट्रेकिंग, ऑफ रोड बाईकिंग, मिडनाईट सायकल रेस आदी साहसी उपक्रमांचा समावेश असतो. नैसर्गिक सर्व संकटांची तमा न बाळगता तीव्र उतार, खडा चढ, खड्डे रस्ते यातून मार्ग काढतही रेस होणार आहे. 40 ते 80 कि.मीची ही रेस असणार आहे.
फॅमिली टीम, कार्पोरेट टीम, कॉलेज कॅटेगिरी, ज्युनिअर टीम, अॅमॅच्युअर टीम, 40 वर्षांवरील टीम कॅटेगरी, ओपन कॅटेगिरी आणि सोलो कॅटेगिरी अशा एकूण 8 गटात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेत 10 वर्षांवरील मुलांना सहभागी होता येईल. सायकलिंग आणि ट्रेकिंग असे स्पर्धेचे स्वरुप असणार आहे. स्पर्धेसाठी एकूण 3 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना हिमाचल प्रदेशातील एमटीबी सायकल स्पर्धेत मोफत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेच्या नियोजनाची जय्यत तयारी रग्गेडियन क्लबतर्फे सुरू आहे. 100 पेक्षा अधिक मावळे, 5 अॅम्ब्युलन्स व 5 डॉक्टर्स रेसच्या मार्गावर सज्ज असणार आहेत. स्पर्धेसाठी भारतासह परदेशातूनही ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांनी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी रग्गेडियन क्लब दाभोळकर कॉर्नर येथील अमात्य टॉवर्स, सहावा मजला येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.यावेळी दिशा पिलाणी व सीमा मनवाणी उपस्थित होत्या
Leave a Reply