झी स्टुडिओजची प्रेक्षकांना नववर्ष भेट’ती सध्या काय करते’6 जानेवारीला प्रदर्शित

 

img-20161223-wa0001कोल्हापूर:प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात लपलेलं ! त्या खास व्यक्तिबद्दल नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल ? ह्या उत्सुकतेला घेऊनच झी स्टुडीओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे ‘ती सध्या काय करते’.नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि होणार सून मी या घरची मधून घराघरांत पोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे तसेच झी मराठी वरील सा रे ग म प लिटिल चॅम्प मध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी आर्या आंबेकर या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणिएकमेकांच्या प्रेमात पाडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल ? आणि ह्याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे ती सध्या काय करते हाअनुराग इतकाच तन्वीचा​ ​चित्रपट आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणं हे खरंच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचं आहे.’ती सध्या काय करते’ या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी ह्याला अपवाद नाहीत. ती सध्या..जितकी ह्या दोघांची गोष्ट आहे तितकीच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ! पण प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि ह्या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा सतीश राजवाडें यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका साकारली आहे हृदित्य राजवाडे,अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरीने तर तन्वीच्या भूमिकेत निर्मोही अग्निहोत्री, गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत.झी स्टुडिओज् चे निखिल साने आणि असंख्य प्रोडक्शनच्या पल्लवी राजवाडे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे असून, पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय राहुल भाटणकर यांनी छायाआरेखन आहे सुहास गुजराथी यांचं. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत निलेश मोहरीर, अविनाश – विश्वजित आणि मंदार आपटे यांनी. यात जरा जरा आणि परिकथेच्या पऱ्या ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत. हृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी. सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या टिझरला काही दिवसांतच पाच लाखाहुन जास्त व्हयूवज् मिळाले असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!