
कोल्हापूर: विद्यापीठांमध्ये ज्ञानमंडळांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून ज्ञानवर्धन करण्याचा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम अत्यंत समाजोपयोगी आहे, असे कौतुकोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यादरम्यान आज विद्यापीठात आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य या तीन विषयांची ज्ञानमंडळे स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे प्रमुख अध्यक्ष तथा संपादक दिलीप करंबेळकर प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, जागतिक स्तरावरील विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान मराठी भाषेत आणण्यामध्ये मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची महत्त्वाची भूमिका आहे. आता नवतंत्रज्ञान आणि ज्ञानाची वाढत असलेली व्याप्ती आणि होत असलेला विस्तार लक्षात घेता विद्यापीठांमधील तज्ज्ञांना त्यामध्ये सामावून घेण्याचा मंडळाचा हेतू अत्यंत स्तुत्य आहे. यामुळे मराठीमधील ज्ञानविस्तार वाढेलच, शिवाय त्यामध्ये आंतरक्रियात्मकतेला संधी असल्याने संवाद वाढेल, लोकसहभाग वाढेल. समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांचे ज्ञानाच्या आदानप्रदानामध्ये समावेशन होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी सामंजस्य करारांवर विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने सचिव सुवर्णा पवार यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, राजशेखर सोलापुरे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. पद्मजा पाटील, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनिश पाटील, डॉ. अरुण भोसले, विश्वकोश मंडळाचे सहाय्यक संपादक सरोजकुमार मिठारी, डॉ. जगतानंद भटकर, राजस वैशंपायन, उमाकांत खामकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply