
कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पारपडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा व पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क असल्याने मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिवाजी सभागृहात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजाचा राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. राजेश देशमुख, निवडणूक निरीक्षक अजित पवार, नंदकुमार काटकर, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची सर्व यंत्रणांनी जागृकपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करुन सहारिया म्हणाले, मतदारांवर दबाव टाकणे तसेच प्रलोभन दाखविणाऱ्या प्रवृत्तीवर पोलीस दलाने आणि निवडणूक यंत्रणेने अंकुश ठेवावा. तसेच निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे.
निवडणूक यंत्रणेने निवडणूक कळात सर्वांना समान वागणूक देण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करुन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया म्हणाले, आचारसंहितेचे कशाही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवावा, जिल्ह्यात येणारी खाजगी विमाने आणि हेलिकॅप्टर्स तसेच जिल्ह्यात येणाऱ्या रेल्वेंची तपासणी जिल्ह्याच्या एंट्री पॉइंटलाच करावी अशी सूचनाही त्यांनी केली. भरारी पथकाबरोबरच स्थीर सर्वेक्षण पथकेही आवश्यकतेनुसार वाढविण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
Leave a Reply