गडकोट स्वच्छ्ता मोहीम राबवून साजरा केला वाढदिवस; भावी पिढिसमोर नवा आदर्श

 

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपला वाढदिवस राज्यातील १०३ किल्ल्यांची स्वच्छता करून साजरा केला. ऐतहासिक पन्हाळगडावर आज संपूर्ण छत्रपती घराण्यासह,शिवमहोत्सव समितिसह हजारो शिवप्रेमी आणि ६७संघटनांनी सहभाग नोंदवत पन्हाळागड स्वच्छ केला.भावी पिढिसमोर नवा आदर्श आज संभाजीराजे यांनी ठेवला.गडकोट संवर्धनाचा संकल्प या निमित्ताने खासदार संभाजीराजे भोसले यांनी केला, तर आजच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिल्याची शुभवार्ता दिल्याचं त्यांनी सांगितली. राज्यातील ५ मोडकळीस किल्लेही केंद्रसरकारकडून संवर्धित होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या पुढाकाराने आजपासून  राज्यातील १०३ ऐतिहासिक किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.

१९ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत आज ऐतहासिक पन्हाळगडावर झाला. खासदार संभाजीराजे सध्या गडकोट किल्ले संवर्धनाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत. किल्ल्यांची ज्यावेळी त्यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांना अनेक किल्ल्यांची दुरवस्था झाल्याचं दिसून आले. त्यामुळे या किल्ल्यांचे जतन व्हावे, तसेच या कार्यात समाजाला समविष्ट करून घ्यावे, या उद्देशाने खासदार संभाजीराजे यांनीही मोहीम हाती घेतली असल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीराजेंच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सुरु असलेल्या संभाजीराजे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज संभाजीराजे यांना शुभेच्छा देताना दिली. त्यामुळे ५३६ कोटींच्या या कामाला दोन महिन्यातच सुरवात होणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली.हार-तुऱ्य़ांऐवजी,डिजिटल बोर्ड ला फाटा देत स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शुभेच्छा देण्याचे त्यांनी केलेल्या आवाहनाला शिवप्रेमींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. शिवभक्त, पर्यावणप्रेमी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. शिवजयंतीपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!