
कोल्हापूर- मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विभागीय माहिती कार्यालयात कथा, कविता, चारोळी, चुटके, अभंग, नाट्यवाचन अशा साहित्य प्रकारांचे मालवणी, अहिराणीसह, कोल्हापुरी रांगड्या बोलीभाषेत सादरीकरण करून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठी भाषा दिन सोहळा उत्फूर्तपणे साजरा केला.
विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सहाय्यक संचालक एस. आर. माने, कवयित्री डॉ. सई लळीत यांच्यासह विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन राज्य शासनाच्यावतीने मराठी भाषा दिन म्हणून राज्यभर साजरा केला जात आहे. मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी राज्य शासनाने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले असून यामुळे मराठी भाषा अधिक संपन्न व समृद्ध होईल, अशी आशा कवयित्री डॉ. सई लळीत यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. त्यांनी यावेळी मालवणी भाषेतील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
बोलीभाषेच्या संवर्धनातून मराठी भाषा अधिक समृद्ध आणि प्रगल्भ होईल, असे सांगून माहिती उपसंचालक सतीश लळीत म्हणाले, समाजातील सर्व घटकांमध्ये मराठी भाषा पोहोचावी यासाठी मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करणे गरजेचे आहे. या दिनाबरोबरच संपूर्ण वर्षभर मराठी भाषा विकासाचा आणि संवर्धनाचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या अनेक कविता आणि कथासार सांगून कवी कुसुमाग्रज यांनी कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या अलौकिक कार्याचा आढावा घेतला. संत गाडगेबाबा यांची काही प्रसिद्ध किर्तनेही सादर केली.
यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच पत्रकारांनी मराठी भाषादिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे, कथासारांचे तसेच मराठी भाषेतील अन्य साहित्याचे वाचन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सहाय्यक संचालक एस. आर. माने यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले तर आभार माहिती सहाय्यक अर्चना माने यांनी मानले. कार्यक्रमास अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000
Leave a Reply