
कोल्हापूर : लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय चांगला असेल तर उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण कोल्हापूर जिल्हा आहे. या समन्वयामुळेच कोल्हापूर जिल्हा निर्मल ग्राम उपक्रमात देशात पहिला तर मानव विकास निर्देशांकात ग्रामिण भागात देशात अग्रभागी आहे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचयत समिती सदस्यांना देण्यात येणारा राजर्षि शाहू छत्रपती पुरस्कार वितरण समारंभ एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील होत्या तर प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, उपाध्यक्ष शशिकांत खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रत्येक योजना राबवित असताना योजनेसाठीचा निधी खर्च झाला का हे पाहण्याबरोबरच त्या योजनेतून होणाऱ्या समाजाच्या विकासाचा उद्देश साध्य झाला का हा विचार प्राध्यन्याने केले पाहिजे असे सांगून एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हा परिषदेने शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रात अधिक लोकाभिमुख काम करण्याची गरज व्यक्त केली. तीस वर्षापुर्वीची गरीबी आज राहिलेली नाही. अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, शहरे वाढत आहेत. ग्रामिण भागाचा विकास होत आहे. पण तरीही माहिलाच्या आरोग्याचे प्रश्न अद्यापही आहेत. त्यांना अल्पदरात शासकीय रुग्णालयामध्ये दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. जिल्हा परिषदेतील शाळांचा शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेऊन ग्रामिण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी व गोर गरिबांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद विविध योजना राबवित आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहून महत्वपुर्ण योगदान दिल्याबद्दल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. यापुढेही चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
Leave a Reply