
कोल्हापूर: रेल्वे हे देशाच्या प्रगतीचे माध्यम मानून संपूर्ण देशभरात रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी 8 लाख 56 हजार कोटींचा गुंतवणूक कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राला न्याय देण्याच्या भुमिकेतून राज्यात 1 लाख 36 हजार कोटी रेल्वे विकासासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विकासाची रेल्वे वेगाने धावणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी केले. वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे मार्गासाठी या अर्थ संकल्पात 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांच्याहस्ते रेल्वेच्या विविध प्रकल्पांची सुरुवात, कोनशिला आनावरण आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये पुणे-दौंड-बारामती विभागाच्या डीईएमयु सेवेची सुरुवात, पुणे-मिरज-लोंढा या 460 कि.मी. रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणाचे कोनशिला अनावरण, पुणे-दौंड मार्गाचे विद्युतीकरण, पुणे स्थानकावर जलशुध्दीकरण संनियंत्र, पुणे स्टेशनावरील सौर ऊर्जा प्रकल्प, पुणे स्टेशनवरील निशुल्क वायफाय सुविधा यांचे लोकार्पण तसेच विश्रामबाग ते माधवनगर रस्त्यावरील उड्डान पुलाच्या कामाची सुरुवातही केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्याहस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमामध्ये करण्यात आली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, कर्नाटकातील खासदार प्रकाश हुक्केरी, महापौर हसिना फरास, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरेश प्रभु म्हणाले, अनेक काळ रेल्वे वाईट स्थितीत अडकलेली होती. निधी नाही म्हणून गुंतवणूक नाही. गुंतवणूक नाही त्यामुळे उत्पन्न नाही आणि उत्पन्न नसल्याने विकासाच्या योजना नाहीत, अशा स्थितीतून रेल्वेला बाहेर काढण्यासाठी देशापातळीवर रेल्वेमध्ये 8 लाख 56 हजार कोटीच्या गुंतवणुकीचा महत्वकांक्षी कार्यक्रम तयार करण्यात आला. केवळ अर्थ संकल्पावर विसंबून न राहता एलआयसीमधून 1.50 लाख कोटी निधी उभा करण्यात आला आहे. तर अडीच वर्षामध्ये रेल्वेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अर्थ संकल्पाच्या माध्यमातून 3.50 लाख कोटी रुपयांचा निधी उभा केला आहे. त्यातून विकासाचे अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यातूनच देशभरातील 400 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद रेल्वेसाठी 76 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र हे देशातील महत्वाचे राज्य असून अन्य राज्यांवर अन्याय न करता महाराष्ट्राला योग्य वाटा देण्यासाठी रेल्वे विकासासाठी महाराष्ट्राला 1 लाख 36 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिले आहेत. सन 2017-18 मध्ये रेल्वेसाठी राज्याला 408 पटीने जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत 50 हजार कोटी रुपयांच्या कामाची 24 डिसेंबर 2016 रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये लातूर-कुर्डूवाडी-मिरज या मार्गाच्या विद्युतीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. यवतमाळ-आचलापूर-आरवी या मार्गावरील शकुंतला रेल्वेसाठी 2177 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. फलटण-पंढरपूर या नवीन रेल्वे लाईनसाठी 1149 कोटी रुपये, देहूआष्टीसाठी 1560 कोटी रुपये, हातकणंगले-इचलकरंजी नवीन लाईनसाठी 10 कोटी रुपये, पुणे-लोणावळा तीसरी आणि चौथी लाईन यासाठी 4253 कोटी रुपये, निधीची तरतुद करण्यात आली आहे. पुणे-मिरज-लोंढ या 460 कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4786 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बारामती-लोणंदसाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, मराठवाड्यासाठी यावर्षी अहमनगर-बीड-परलीसाठी 780 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे असेही प्रभु यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply