
कोल्हापूर : भारताची लोकसंख्या 125 कोटी असली तरी केवळ 7 कोटी 50 लाख लोकांकडेच पासपोर्ट आहे. पासपोर्टही आता अत्यावश्यक बाब बनली असून मागणी करणाऱ्या प्रत्येकाला पासपोर्ट मिळावा यासाठी भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन विदेश सेवा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
कोल्हापूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयात महाराष्ट्रातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन छत्रपती शाहू महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात विदेश सेवा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, पोस्टमास्टर जनरल विनोद कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार उपस्थिती होते.
विदेश सेवा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, कोल्हापूर येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र झाल्याने पासपोर्टसाठी पुण्याला जाण्याचा लोकांचा त्रास, वेळ आणि पैसा यासाऱ्यांमध्ये बचत झाली आहे. या सेवा केंद्रासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी खुप पाठपुरावा केला असून जनसेवक आणि लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने होणाऱ्या उत्कृष्ठ कामगिरीचा नमूना म्हणजे हे कार्यालय आहे. पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे कामकाज संपूर्ण पारदर्शी व सक्षमपणे चालणार असल्याचे सांगून डॉ. मुळे यांनी या ठिकाणी दररोज 50 जणांना पासपोर्ट वितरणाची सुविधा केली असून आवश्यकता पडल्यास हा विस्तार 200 पर्यंत करण्याची क्षमता ठेवण्यात आली आहे. पोलीस पडताळणी बाबतीत महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्रप्रदेशपेक्षा मागे असून तेथे पोलीस पडताळणी लागणारा कालावधी तीन दिवसांचा असतो तर महाराष्ट्रात हा कालावधी 21 दिवस त्यापेक्षा जास्त लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सविनय कायदेभंगाचे गुन्हे अनेकांवर आहेत,अशा स्थितीत सर्व सामान्यांच्या हक्कासाठी लढा देणारे सामान्य कार्यकर्ते पासपोर्ट सुविधे पासून वंचित राहू नये यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही डॉ. मुळे यांनी यावेळी सांगितले. तसेच हजारो कोटींचे कर्ज बडवून भारताबाहेर गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटीश मंत्रालय भारतात परत पाठविणार असून यामध्ये परराष्ट्र खात्याचे प्रयत्न कारणी लागल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Leave a Reply