
मुंबई:पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह राज्य पुरस्कारात सर्वोत्तम ठरलेला ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. स्टार प्रवाहवर रविवार २ एप्रिल रोजी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. अभिनेता मकरंद अनासपूरेची आजवरची वेगळी दमदार भूमिका, मराठीत यापूर्वी सादर न झालेला विषय आणि मांडणी यामुळे हा चित्रपट लोकप्रिय ठरला.
‘रंगा पतंगा’ या चित्रपटात जुम्मन या विदर्भातील शेतकऱ्याची गोष्ट उलगडण्यात आली आहे. आजुबाजूला भवताल बदलत असताना बैलजोडी सांभाळून शेती करणाऱ्या आणि ही बैलजोडी हरवल्याने त्यांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्याला सोसाव्या लागणाऱ्या समस्यांचे चित्रण हा सिनेमा करतो. वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट उलगडताना सामाजिक परिस्थितीवर आणि व्यवस्थेच्या अनास्थेवरही हा सिनेमा मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. मकरंद अनासपूरे, नंदिता धुरी, संदीप पाठक, गौरी कोंगे, भारत गणेशपुरे, उमेश जगताप, तेजपाल वाघ आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा चिन्मय पाटणकर, पटकथा-संवादलेखन आणि दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांचं आहे. तर, इलाही जमादार यांच्या अर्थपूर्ण गीताला कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलं आहे. एकच गीत गझल आणि कव्वाली या दोन प्रकारात संगीतबद्ध करण्याचा वेगळा प्रयोग या चित्रपटात झाला. सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे यांचे एकंदर चित्रपटाच्या आशयाला अधोरेखित करणारे छायांकन हेही या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य.
या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली आहे. 14व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा संत तुकाराम पुरस्कार आणि प्रसाद नामजोशी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा पुरस्कार या चित्रपटाने पटकावला होता. इटलीतील रिव्हर टू रिव्हर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झालेला हा एकमेव मराठी चित्रपट होता. असा हा आवर्जून पाहावा असा रंगा पतंगा येत्या रविवारी २ एप्रिल रोजी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.
Leave a Reply