
कोल्हापूर: जिल्हा बँक खातेदारांच्या केवायसीची पुन्हा एकदा 6 एप्रिल पासून पडताळणी करण्यात येणार आहे. नोटाबंदीच्या काळात बँकेकडे जुन्या 500 व 1000 रुपयांच्या 279 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्यापूर्वी ‘नाबार्ड’कडून पुन्हा एकदा प्रत्येक खात्याच्या केवायसीची तपासणी केली जाणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनंतर ‘नाबार्ड’ने यापूर्वी दोनदा जिल्हा बँकेच्या खातेदारांची केवायसी तपासली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनंतरच ही तपासणी करण्यात आली होती. यापूर्वी करण्यात आलेल्या तपासणीवेळी ज्या खातेदारांनी 50 हजार रकमेपेक्षा अधिक रकमेच्या जुन्या 500 व 1 हजार रुपयांच्या नोटा भरल्या, त्या खात्यांची चौकशी केली होती. या तपासणीनंतर जुन्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी बँकेला अपेक्षा होती. जुन्या नोटा बँकेतच राहिल्याने बँकेला महिन्याला 10 कोटी रुपयांचे व्याज देऊन तोटा सहन करावा लागत आहे. असे असताना पुन्हा एकदा केवायसी तपासणी केली जाणार असल्याने जुन्या नोटा जमा करण्यास आणखीही विलंब होणार आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या 500 व 1 हजार रुपयांच्या नोटा जिल्हा बँकेत जमा करण्यासाठी चारच दिवसांचा अवधी देण्यात आला होता. या काळात बँकेत 279 कोटी रुपये भरण्यात आले. यामध्ये 50 हजार व त्यापेक्षा अधिक रकमेच्या जुन्या नोटा जमा करणार्या खातेदारांची संख्या 1 लाख 20 हजार, तर सेवा संस्थांच्या सुमारे 30 हजार खात्यांवर ही रक्कम भरली आहे. अशा या दीड लाखापेक्षा अधिक खातेदारांच्या केवायसीची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी ‘नाबार्ड’चे एक पथक केडीसीसीत गुरुवारी दाखल होणार आहे.
Leave a Reply