
मुंबई:हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय सिनेमॅटोग्राफरअसलेल्या बाळू दहिफळे यांनी मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे.. स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ या मालिकेचं छायांकन बाळू दहिफळे यांनी केलं आहे. ‘मराठी मालिकांमध्ये खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत.
सध्या मराठी मालिका हिंदीच्या तोडीस तोड काम करत आहेत,’ असं त्यांचं मत आहे.
पैठणचे सुपुत्र असलेल्या बाळू दहिफळे यांनी आजवर मोह मोह के धागे, एक दुजे के वास्ते, तू मेरा हिरो अशा अनेक हिंदी मालिकांचं छायांकन केलं आहे. सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरलेल्या ‘नकुशी’ मालिकेचं साताऱ्यात झालेलं अस्सल गावगाड्याचे चित्रीकरण किंवा मनाली नेत्रसुखद चित्रण ही त्यांच्याच कॅमेऱ्याची किमया. जवळपास १५ वर्षं या क्षेत्रात कार्यरत असूनही ‘नकुशी’ ही त्यांची पहिलीच मराठी मालिका आहे. ‘शशी सुमित प्रॉडक्शनसोबत मी हिंदीत काम केलं होतं. त्यांनीच या मालिकेची निर्मिती केली आहे. नकुशी या मालिकेचा विषयच मला वेगळा वाटला. अशी काही प्रथा आपल्याकडे आहे, हेच मला माहीत नव्हतं. वेगळी कल्पना असल्यानं मला विचारणा झाल्यावर लगेच मी ही मालिका करायचं ठरवलं. दिग्दर्शक वैभव चिंचाळकरनं विषयाचा आणि मालिकेचा पूर्ण विचार केला होता. त्यामुळे कलाकारांचा लुक, छायांकनासाठीची प्रकाशयोजना याचाही मी नीट अभ्यास केला ,’ असं त्यांनी सांगितलं.
इतक्या वर्षांनी मराठी मालिका करण्याविषयी ते म्हणतात, ‘ मुळात काम करायचे ते मोजके पण दर्जेदार त्यामुळे हिंदीत बरेच काम झाले,पण मराठीत हा योग येत नव्हता. त्याशिवाय अनेकांना वाटतं, की मी हिंदीत काम करतो म्हणजे खूप पैसे घेतो, आपल्याला कसं परवडणार… त्यामुळे फार ऑफर्सही नाही आल्या. उशीर झाला असे वाटत असले तरी नकुशीच्या वेगळेपणामुळे लोक त्याची जी दखल घेतली जाते आहे,त्याचे समाधान जास्त आहे.’
नुकतंच ‘नकुशी’चं चित्रीकरण मनाली इथं करण्यात आलं. त्या अनुभवाविषयी ते म्हणाले,’मनालीला चित्रीकरण करण्याचा फारच कमाल अनुभव होता. मात्र, तिथं जाऊन काम करणं प्रचंड अवघड होतं. मनालीला खूप थंडी होती. बर्फ पडत होता. काम करताना हात सुन्न व्हायचे. इतके, की हात आहेत की नाही हे कळत नव्हतं. उपेंद्र लिमये, प्रसिद्धी आयलवार हे कलाकारही थंडीनं गारठून जायचे. तरीही, आम्ही उत्तम पद्धतीनं चित्रीकरण केलं.’
दीर्घकाळ टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यरत असूनही दहिफळे यांना मराठी मालिका वेगळ्या असल्याचं वाटतं. ‘मराठी मालिका सध्या हिंदीच्या तोडीस तोड काम करत आहेत. खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. खरंतर टेलिव्हिजन हे माध्यम जरा बटबटीत आहे. त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. काही ठरलेली सूत्रं आहेत. या सगळ्यात ‘नकुशी’ वेगळी मालिका आहे, असं मी म्हणेन,’ असं त्यांनी सांगितलं
Leave a Reply