चांगला पाऊस होऊ दे शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाला बळ दे:पालकमंत्र्यांचे श्री जोतिबाला मागणे

 

कोल्हापूर:महाराष्ट्रात यंदा आणि पुढील वर्षीही चांगला पाऊस होऊ दे आणि राज्यातील शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढू दे, महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाला जे करावे लागेल त्यासाठी बळ दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दख्खनचा राजा श्री जोतिबाला घातले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. त्यांच्या समवेत आमदार सत्यजित पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार शंभुराजे देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, समरजीतसिंह घाडगे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, सरपंच डॉ. रिया सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 हजार कोटीने वाढले. पुढच्या वर्षीही पाऊस चांगला झाला तर उत्पन्न काही हजार कोटीने वाढेल. यासाठी यावर्षी आणि पुढील वर्षीही महाराष्ट्रात चांगला पाऊ होऊ दे, अशी प्रार्थना जोतिबा चरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. श्री जोतिबा यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा कुलस्वामी श्री जोतिबाच्या यात्रेसाठी लाखोंचा भाविक जमला असून या यात्रेचे नेटक नियोजन आणि चोख बंदोबस्त प्रशासनाने ठेवला आहे. कडक उन्हाळा असल्याने भाविकांनी सुखरुपपणे, शांततेत यात्रा पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री जोतिबा परिसर विकासाचा पहिल्या टप्यातील 30 कोटीचा आराखडा करण्यात आला असून 25 कोटी शासन आणि 5 कोटी देवस्थान ट्रस्ट भर घालणार आहे. या पहिल्या टप्यातील आराखड्यानुसार 5 हजार भाविकांची सोय होईल यादृष्टीने सर्व सुविधा युक्त 4 मजली दर्शन मंडपाची प्रक्रिया सप्टेंबर मध्ये पूर्ण करुन पुढील वर्षी हा दर्शन मंडप भाविकांसाठी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.
जोतिबा ते पन्हाळा रोप वे करण्याचा एक प्रस्ताव आला असून या संदर्भात आवश्यक त्या पूर्तता आणि अडचणी दूर करुन सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनास सांगण्यात आले आहे. या प्रस्तावानुसार आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्य क्रमाने करुन रोप वे चा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
श्री जोतिबाची यात्रा मोठ्या भक्ती भावाने, उत्साहाने होत असून यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी प्रशासनाने उत्तमरितीने घेतली आहे. भाविकांना कसलाही त्रास होवू नये यासाठीही आवश्यक दक्षता आणि काळजी प्रशासनाने घेतली आहे. आपण सर्वजण वर्षानुवर्षे श्री जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी भक्ती भावाने येतो. कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ या,असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, देवस्थान कमिटीच्या सदस्या संगीता खाडे, प्रमोद पाटील, बी.एल.पाटील, शिवाजी पाटील, सचिव विजय पवार तहसिलदार रामचंद्र चोबे, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, शहर वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, श्री. अजितसिंह काटकर आदि मान्यवर उपस्थित होते.
जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आदि राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. उंच सासनकाठ्या नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरुन यात्रेत सहभागी झाले होते. विविध रंगांच्या सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिराची शोभा वाढली.
पश्चिम महाराष्ट्र दवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे श्री जोतिबाची प्रतिमा देवून स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!