
कोल्हापूर : कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते, तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन डॉ. एन.डी. पाटील यांनी आज येथे काढले.
शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा ‘प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार’ साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेस आज सकाळी प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला. रोख १,५१,००० रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहेडॉ. पाटील म्हणाले, कर्मवीरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रयोग केले. या प्रयोगांमुळे समाजातल्या तळागाळातल्या, गोरगरीब, दलित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील होणे शक्य झाले. खेड्यापाड्यातल्या मातीतली रत्नं त्यांनी गोळा केली आणि त्यांच्या माध्यमातून समतेची रचना केली. रा.कृ. कणबरकर सरांनाही त्यांनी असेच बेळगावहून साताऱ्याला शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून आणले. त्यांना कराडच्या संत गाडगे महाराज महाविद्यालयाचा प्राचार्यही केले. अण्णांचा कणबरकर सरांना साताऱ्याला आणण्याचा निर्णय सरांच्या कारकीर्दीवर दूरगामी परिणाम करणारा ठरला. महाराष्ट्राचे व्यापक कार्यक्षेत्र कणबरकरांना लाभले आणि आपली लेखणी, वाणी बहुजनांच्या उद्धारासाठी वापरून त्यांनी नवी महाविद्यालये आणि विद्यार्थी घडविले. कणबरकर सर अत्यंत नेकदार, सरळमार्गी व सर्जनशील वृत्तीचे व्यक्ती होते. राजर्षी शाहू महाराजांविषयीचा जिव्हाळा हा आम्हा दोघांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply