
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला प्राधान्य देवून ॲग्रो टुरिझमचा विकास करुन शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहू. याबरोबरच जोतिबा परिसरासह जिल्ह्यातील सर्व देवस्थानांचा विकास करुन भाविकांना सुविधा उपलब्ध करुन देवू, असे प्रतिपादन नुतन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्ती झालेल्या अविनाश सुभेदार यांनी जिल्हाधिकारी पदाचा डॉ. अमित सैनी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळीत, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिथडे, जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त मुख्य लेखाधिकारी गणेश देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.जी.किणिंगे यांची उपस्थिती होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी नुतन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी काम केले असल्याने जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांची आपल्याला माहिती असल्याचे सांगून अविनाश सुभेदार म्हणाले, सातबारा संगणकीकरणाला गती देणार असून याबरोबरच पर्यटन विकासाला चालना देणार आहे. कोल्हापूर जिल्हा हा विकासाचा ध्यास असलेल्या लोकांचा जिल्हा आहे. चांगल्या नव्या कल्पना लोक स्वीकारतात व त्यामध्ये सहभागी होतात. जिल्ह्यात ॲग्रो टुरिझमला चांगली संधी आहे त्याचा विकास करुन शेतकरी बांधवांना लाभ मिळवून देवू. विमानतळ लवकर सुरु झाले तर दळण वळण वाढेल त्यामुळे त्यासाठीही प्राधान्याने प्रयत्न केले जातील. 74 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आले असून या गावांमध्ये तातडीच्या उपाय योजना केल्या जातील. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 18 गावे शासकीय निकषानुसार निवडण्यात आली असली तरी 56 गावांमध्ये हे अभियान राबविण्याचे आवश्यकता आहे. या सर्व गावांमधून जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने करण्यात येतील तसेच पंचगंगा प्रदुषण प्रश्नावरही लक्ष केंद्रीत करण्यात येईल,असे त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply