

महागणपती फिल्म्स अंतर्गत जालिंदर भुजबळ यांची निर्मिती तसेच अर्जुन भुजबळ यांची सहनिर्मिती असलेल्या ‘खोपा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. सुधीर निकम यांनी केलं आहे. नातेसंबंध हा मानवी जीवनाचा गाभा आहे. काही माणसं नातेसंबंधांपासून पळ काढीत स्वतःचं एक वेगळ विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण कालांतराने त्यांना आपल्या चुका समजतात आणि पुन्हाते आपल्या नातलगांचा शोध घेत फिरतात. समाजात वावरताना ठराविक अंतराने आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं, पण या चित्रपटात मात्र प्रेक्षकांना नातेसंबंध जोडणाऱ्या शंभरी नंबरी सोनं असलेल्या माणसांची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा एका लहान मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. कथा जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी लहान मुलांच्या भावविश्वावर नसून त्याच्या भोवतीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे.
आजवर बऱ्याच चित्रपटांचं लेखन केलेल्या डॉ. सुधीर निकम यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. लेखनाकडून दिग्दर्शनाकडे वळताना त्यांनी आपल्या चित्रपटासाठी मानवी नातेसंबंधांसारखा भावनिक विषय निवडला आहे. याबाबत ते म्हणतात की, आजच्या धावपळीच्या युगात नातेसंबंध दुरावत असल्याचं आपण सर्वजण पाहात आहोत. खरं तर या काळात नातेसंबंध जपण्याची गरज आहे, त्यामुळेच या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका लहान मुलाच्या आयुष्यात अचानक एक घटना घडते, त्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अशा परिस्थितीत नात्यागोत्याच्या नसलेल्या व्यक्ती त्याचं जीवन सावरण्यात मदत करतात अशी या चित्रपटाची वनलाईन आहे. एक सुरेख कथा सुमधुर गीत-संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘खोपा’च्या संपूर्ण टिमने केल्याचं निकम मानतात. प्रेक्षकांनाही हा चित्रपटखूप आवडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटाची कथा व गीत लेखनही निकम यांनीच केलं आहे.
महागणपती फिल्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी चित्रपट निर्मिती करताना समाजा समोर नवा आदर्श निर्माण करणारी कलाकृती बनवण्याचा आपला मानस होता अशी भावना निर्माता जालिंदर भुजबळ यांनी व्यक्त केली. केवळ उपदेश न करता ‘खोपा’च्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रबोधन करण्याचा आपल्या टिमचा प्रयत्न अल्याचं भुजबळ यांचं मत आहे. चित्रपटाची कथा ह्दयाला भिडणारी असून सर्वच कलाकारांनी संवेदनशील अभिनय केल्याचं भुजबळ मानतात.
‘खोपा’मध्ये संकर्षण कऱ्हाडे, ऐश्वर्या तुपे, यतिन कार्येकर, रूपलक्ष्मी चौगुले, भारत गणेशपुरे, आशा तारे, केतन पवार आणि विक्रम गोखले प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडेकर, जालिंदर भुजबळ, दीपा गायकवाड,संजय भुरे, प्रमोद रामदासी, डॉ. सुधीर निकम, विद्या भागवत, प्रशांत तपस्वी, कस्तुरी सारंग, गौतमी देवस्थळी, विनिता संचेती, यश दौंडकर आणि ऋषिकेश बाम यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाद्वारे मराठीमध्ये प्रथमच व्हीएफएक्सचा भरपूर वापर करण्यात आला असून गिनींलाल सोलंकी यांनी व्हीएफएक्सची बाजू सांभाळली आहे. प्रविण वानखेडे हे याचित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. समीर भास्कर यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून स्मिता फडके यांनी संकलन केलंआहे. प्रशांत निगोजकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक आहेत, तर संदिप इनामके कला दिग्दर्शक आहेत. सतिश सांडभोर यांनी याचित्रपटातील व्यक्तिरेखांचं कॉस्च्युम डिझायनिंग केलं असून कुमार मगरे यांनी मेकअप केला आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्ल चंद्रयांनी या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय गवंडे यांनी सांभाळली आहे. राशी बुट्टे या चित्रपटाचे साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत, तर मानस माळी यांनी या चित्रपटाचं साऊंड डिझाइन केलं आहे.
Leave a Reply