
कोल्हापूर: कोणत्याही अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय प्रॅक्टीस करणाऱ्या व जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कायद्याप्रमाणे अत्यंत कडक कारवाई करा असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाली या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक संजय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, पोलीस उपअधिक्षक (गृह) सतिश माने, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिषीर मिरगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, बोगस डॉक्टर्स ही अतिशय गंभीर बाब असून त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हा स्तरावर पोलीस प्रशासनाच्या मदतीने पथक तयार करुन धडक मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामीण तसेच दुर्गम भागामध्ये बोगस डॉक्टरांचे अधिक प्रमाण आढळून आले असले तरी शहरी भागामध्येदेखील बोगस डॉक्टरांसंबंधी धडक मोहिम राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. इलेक्ट्रोहोमिऑपॅथी व्यवसाय करणारे डॉक्टर जर ॲलॉपॅथीची प्रॅक्टीस करताना निदर्शनास आले तर त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बोगस डॉक्टर्स अथवा एखाद्या डॉक्टरची प्रॅक्टीस शंकास्पद वाटल्यास नागरीकांनी ही बाब पोलीस प्रशासन तसेच प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व बोगस डॉक्टर्स यांच्याविषयी नेहमी दक्ष रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. आर. एस. साहू, ॲडव्होकेट गौरी पाटील यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply