
कोल्हापूर: शाहू जन्मस्थळी जागतिक किर्तीचे म्युझियम व्हावे यासाठी शासनाने 13 कोटीचा निधी मंजूर केला असून त्याची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होवून काम गतीने पूर्ण होईल. या व्यतिरिक्त ज्या कामांची आवश्यकता असेल त्याची यादी समितीने करावी. लोकसहभागातून ही कामे केली जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शाहू जन्मस्थळ कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जेष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, डॉ. इंद्रजीत सावंत, वास्तुविशारद अमरजा निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, वसंतराव मुळीक, पुरातत्व विभागाचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील, महेश जाधव, संजय पवार, प्रा. वसंत मोरे यांची प्रमुख उपस्थित होते.
शाहू जन्मस्थळी करण्यात येत असणाऱ्या कामांमध्ये म्युझियमसाठी पेंटींग, शिल्प, छायाचित्रे ही जागतिक दर्जाची असावीत. समितीच्या सदस्यांनी ती मान्य केल्याशिवाय लावण्यात येवू नयेत असे सांगून म्युझियमच्या कामाशी संबंधित सर्व निविदा त्वरीत काढण्यात याव्यात अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. म्युझियम करत असताना म्युझियमचा दर्जा अतिउच्च रहावा. यामध्ये शाहू महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगाची मांडणी उत्कृष्ठपणे व्हावी, त्याचा दर्जा सांभाळला जावा. याबरोबरच या ठिकाणाकडे पर्यटकांचा ओढा वाढावा यासाठी, याठिकाणी करण्यात येत असलेल्या राधानगरी धरणाच्या प्रतीकृतीवर पुरातत्व विभागाच्या परवानगीने तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. या स्थळाचा दर्जा उंचावण्यासाठी समितीच्या सदस्यांना ज्या गोष्टी करणे आवश्यक वाटते त्याची यादी करण्यात यावी. शासकीय निधी व्यतिरिक्तही त्यासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply