
कोल्हापूर : शिक्षणामध्ये माणूस घडविण्याची ताकद असल्याने तरुणांनी चांगलं शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या युपीएससी केंद्राचा शुभारंभ केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे – पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, सौ. अंजली चंद्रकांत पाटील, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे काम विद्या प्रबोधिनीच्या माध्यमातून होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी विद्या प्रवोधिनींने हाती घेतलेले उपक्रम महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्या प्रबोधिनींच्या वतीने या पुढील काळात ग्रामीण भागातील तरुण-तरुणींची विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्याबरोबरच त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच प्रायव्हेट एम्लॉयमेंट एक्सचेंजची सुविधा उपलब्ध करुन देवून रोजगार – स्वयंरोजगाराच्या दृष्टीने त्यांना आवश्यक त्या मार्गदर्शनाव्दारे त्यांची तयारी करुन घेण्यावर भर दिला जाईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्यपूर्ण वाचन आणि अभ्यासाव्दारे स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. स्पर्धा परीक्षांची अचूक माहिती घेऊन वाचन, सराव आणि खडतर प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल. प्रशासकीय सेवेतून जनसेवा हे व्रत जोपासून सामान्य माणासाचे हित जोपासण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विलास नांगरे-पाटील यांनी प्रशासकीय सेवा आणि स्पर्धा परीक्षा या संदर्भात सविस्तर व्याख्यान दिले. विद्यार्थी-विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांतील यशासाठी ध्येय निश्चित करुन अभ्यासाची तयारी करावी. सकारात्मक विचार करण्याबरोबरच अथक मेहनत करा, तुम्हाला यश निश्चित मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रबोधिनीने स्पर्धा परीक्षांसाठी सुरु केलेले हे केंद्र विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी परीक्षा पध्दती, सिलॅबस, वेळोवेळी होणाऱ्या सुधारणा समजून घेऊन परीक्षेचा सराव करावा,असा सल्ला देऊन श्री. नांगरे- पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वत:चा शब्दसंग्रह वाढविण्याबरोबरच प्रश्नपत्रिकेचा सराव करावा. अभ्यासाच्या टिप्स स्वत:च तयार कराव्यात. उद्दिष्टाला पूरक सवयी जोपासाव्या. अभ्यासाबरोबर सातत्यपूर्ण व्यायाम जोपासावा, मनात भिती न बाळगता साहस आणि निर्धाराने परीक्षेला सामोरे जावे, अभ्यास करतांना सर्वच क्षेत्रांचा चिकित्सकपणे अभ्यास करावा तसेच परीक्षेच्या तयारीचे स्मार्ट नियोजन करावे, आपली बलस्थाने, क्षमता आपणाच वाढवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी स्वागत करुन प्रबोधिनीमार्फत विद्यार्थ्यांसाठी तसेच स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुरु केलेल्या उपक्र्रमाची आणि सुविधांची माहिती दिली. शेवटी स्किल डेव्हलपमेंट प्रमुख नितीन कामत यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास युपीएससी विभाग प्रमुख प्रविण गांगुर्डे, एमपीएससी विभाग प्रमुख अमित लवटे, बँकींग प्रमुख वृंदा सलगर यांच्यासह अनेक मान्यवर,पदाधिकारी, अधिकारी आणि स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थी-विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply