मंदिरातील घटनेच्या निमित्ताने जातीयवाद पसरवणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा; श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीची मागणी

 

   कोल्हापूर  – येथे गेल्या काही दिवसांपासून ‘श्री महालक्ष्मी’ कि ‘श्री अंबाबाई’ असा वादही निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही विचारप्रवाहांकडून विविध शिलालेख, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा आधार दिला जात आहे. शासनाने या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा अभ्यास करण्यासाठी निःपक्षपाती विचारांच्या इतिहास संशोधकांची एक समिती नियुक्त करावी आणि या वादावर कायमचा पडदा टाकावा. श्री महालक्ष्मी मंदिरातील घटनेच्या निमित्ताने जातीयवाद पसरवणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा; अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणी श्री महालक्षमी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे प्रवक्ते  सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पत्रकार परिषदेला बजरंग दलाचे जिल्हाप्रम. संभाजी साळुंखे, शहरप्रमुख  महेश उरसाल, शिवसेनेचे कागल शहर प्रमुख  किरण कुलकर्णी, शिवप्रतिष्ठानचे  शरद माळी, महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे प्रवक्ता सुनिल घनवट, सदस्य सर्वश्री सुधाकर सुतार, प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.
सुनील घनवट पुढे म्हणाले की, गत ३ आठवड्यांपासून या श्री महालक्ष्मी मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मंदिरातील श्रीपूजकांनी श्री महालक्ष्मी देवीला ‘घागरा-चोळी’ नेसवल्याविषयी आम्ही याचा निषेध करतो. या गंभीर चुकीविषयी संबंधित दोषी श्रीपूजकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची भूमिका आहे.मात्र हे सर्व चालू असतांना श्री महालक्ष्मीचे मंदिर हे राजकीय अन् जातीयवादी लोकांचा आखाडा बनू नये. तसेच या घटनेचा वापर करून काही देव-धर्म न मानणारी पुरोगामी, नास्तिकतावादी मंडळी मंदिरातील परंपरा मोडण्याचे षड्यंत्र करत आहेत, याला आमचा तीव्र विरोध आहे. तसेच श्री महालक्ष्मी मंदिर हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळे अन्य धर्मिय या बैठकांमध्ये उपस्थित राहू नये, अन्यथा त्यांच्या धार्मिक बैठकांतही हिंदुत्ववनिष्ठांना  बोलवावे.  महेश उरसाल म्हणाले की, ‘घागरा चोळी’चे नेसवण्याचे प्रकरण अयोग्य आहे; मात्र हे प्रकरण घडल्यानंतर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लगेच आक्षेप घेऊन देवीची दुसरी पूजा का बांधली नाही ? देवस्थान समितीला नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे, तर मग समितीच्या सचिवांना देवीची दुसरी पूजा बांधून या वादावर तोडगा काढण्याचे का सुचले नाही ? श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर सोयीनुसार वज्रलेप का केला जातो ? शासनानेच श्रीपूजकांच्या वर्तवणुकीविषयी धर्माशास्त्रीय आचारसंहिता सिद्ध करावी. संभाजी साळुंखे म्हणाले की, काही दिवसांपासून ‘अंबाबाई मंदिरातून ब्राह्मण पुजारी त्वरित न हटवल्यास कोल्हापुरात १९४८ ची पुनरावृत्ती होईल !’ अशा प्रकारचे जातीय तेढ निर्माण करणारे संदेश जिल्ह्यात ‘व्हॉटस्अ‍ॅप’ या सामाजिक संकेतस्थळावरून पसरवले जात आहेत. या वादाचा आधार घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे कारस्थान समाजकंटकांनी रचल्याची शंका येते. त्यामुळे असे समाजद्रोही संदेश पाठवणारे समाजकंटक कोणत्याही जातीचे असले, तरी त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सायबर सेलद्वारे विकृत संदेश पाठवणार्‍यांचा त्वरित शोध घेता येतो. दिलीप पाटील यांना धमकी देणे हे अयोग्य आहे. ही धमकी कोणी दिली, त्याचा पोलिसांनी मुळाशी जाऊन शोध घ्यावा. कोणीही अशी धमकी दिली की त्याचे खापर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीवर फोडले जाते, हे चुकीचे आहे. असे धमकी देऊन मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत आहे.
तुळजापूर येथील श्री भवानी मंदिर आणि येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थाप पहाणारे देवस्थान समितीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (सीआयडी) चौकशी संथ गतीने न करता ती जलद गतीने करून दोषींवर कारवाई करावी, अशीच आमची मागणी आहे. शासनाने या प्रकरणातील गुन्हेगारांना झुकते माप देऊ नये.
हिंदु जनजागृती समितीने मंदिर सरकारच्या कह्यात नको, तर ती भक्तांच्या कह्यात देण्याची मागणी पहिल्यापासून केली आहे. कारण शिर्डी, सिद्धीविनायक मंदिराचे सरकारीकरण झाल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. पंढरपूरचे देवस्थान सरकारच्या कह्यात असल्यामुळे तेथे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. देवस्थानकडून गायींची योग्य पद्धतीने देखभाल न केल्याने ८ गायींचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!