
कोल्हापूर : २० जुलैला होणार्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिर्डी, पंढरपूरच्या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याचा ठराव करण्यात येऊ नये, यांसह इतर मागण्यांचे निवेदन महापौर सौ. हसिना फरास यांना आज दुपारी वाजता देण्यात आले. ‘येत्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत याविषयावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल’, असे आश्वासन महापौर सौ. हसिना फरास यांनी दिले. या वेळी हिंदू महासभा, पतित पावन संघटना, वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशन, हिंदू एकता आंदोलन, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्वश्री हिंदू महासभेचे शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, विहिंपचे श्री. अशोक रामचंदानी, हिंदू महासभेच्या श्रीमती सुवर्णा पवार, सौ. रेखा दुधाणे आदी उपस्थित होते. हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका मांडतांना हिंदुत्ववादी गोविंद देशपांडे म्हणाले की, एका पुजार्याने चूक केली म्हणून सरसकट सर्व पुजार्यांना काढून टाका, असे म्हणणे अयोग्य आहे. वेद मंत्र पठन करणारे, शास्त्र माहीत असणारे आणि कर्मकांडांचे सर्व पालन करणारे श्रीपूजक मंदिरात असणे आवश्यक आहे. इतर जातींमधील पुजार्यांची नियुक्ती केल्यावर त्यांना या सर्व गोष्टी कशा येतील. त्यामुळे सभेत ठराव करण्यापूर्वी महापौरांची आमच्या मागण्यांचा विचार करावा. वन्दे मातरम् युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये म्हणाले की, शासनाने या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा अभ्यास करण्यासाठी निःपक्षपाती विचारांच्या इतिहास संशोधकांची एक समिती नियुक्त करावी आणि या वादावर कायमचा पडदा टाकावा. हिंदू महासभेच्या सौ. रश्मी आडसुळे म्हणाल्या की, पूर्वापारपासून श्री महालक्ष्मीदेवीवर श्रद्धा असल्याने देवीला श्री महालक्ष्मी असेच सर्व म्हणत आले आहेत. त्यामुळे आता ‘अंबाबाई’ असे नाव देणे योग्य ठरणार नाही. तसेच ‘श्री महालक्ष्मी का अंबाबाई’ असा वाद निर्माण करणे अयोग्य आहे. हिंदु जनजागृती समितीचे नाझरे म्हणाले की, गत ४ आठवड्यांपासून श्री महालक्ष्मी मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणार्या भाविकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नास्तिकवादी आणि पुरोगामी मंडळींनी श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक हटवून तेथे शिर्डी, पंढरपूरच्या धर्तीवर सरकारी पगारी पुजार्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे, तसेच त्यांनी ‘श्री महालक्ष्मीऐवजी’ ‘श्री अंबाबाई’ नाव द्यावे म्हणून असा वादही निर्माण केला आहे; मात्र या दोन्ही मागण्यांना आमचा कडाडून विरोध आहे. पंढरपूर येथे पगारी सरकारी पुजार्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना पूजा आणि मंत्रपठन करता येत नाही. हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे म्हणाले की, नास्तिकवादी आणि पुरोगामी मंडळी हे देव मानत नाहीत, त्यामुळे त्यांना श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजकांना हटवा, असा म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही. राजकारण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा काही मंडळी प्रयत्न करत आहेत. श्री महालक्ष्मी मंदिर आणि वारसास्थळे ही राजकीय अन् जातीयवाद यांचा आखाडा बनू नये. तसेच या घटनेचा लाभ घेऊन काही देव-धर्म न मानणारी काही मंडळी परंपरा मोडू पहात आहेत. याला आमचा विरोध आहे.
Leave a Reply