कोल्हापूर-शिर्डी थेट रेल्वेसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची तत्त्वतः मान्यता

 

नवी दिल्ली:कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वे-गाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण, तिथली प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा मिळण्याबाबत तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नवीन रेल्वेची मंजुरी मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खासदार महाडिक यांनी दिल्ली इथं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोल्हापूर-शिर्डी (साईनगर) अशी थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. आठवड्यातून एकदा ही गाडी सोडण्याचं नियोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी रेल्वेची उपलब्धता असल्याचेही त्यांनी नामदार प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले.

कोल्हापूर ते नागपूर एक्स्प्रेस आठवड्यातून एकदा निघते आणि कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मेंटेनन्सनंतर ती गाडी तब्बल ३२ तास मिरज स्टेशनच्या रॅकमध्ये उभी असते. या कालावधीमध्ये या रेल्वे-गाडीचा वापर करून कोल्हापूर-शिर्डी अशी थेट रेल्वे सुरू करता येईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. नामदार प्रभू यांनी या प्रस्तावित गाडीच्या वेळांबाबत माहितीची विचारणा केली असता खासदार महाडिक म्हणाले, बुधवारी सायंकाळी चार वाजता ही गाडी कोल्हापुरातून निघाल्यास गुरुवारी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी शिर्डीला पोहोचेल. तसेच गुरुवारी सकाळी शिर्डीतून माघारी कोल्हापूरला निघाल्यास गुरुवारी रात्री उशिरा १२ ते १२.३० दरम्यान पोहोचेल. तसेच नागपूरच्या फेरीसाठी ही गाडी पुन्हा सज्ज राहू शकते. रेल्वेमंत्री प्रभू यांनी रेल्वे ट्रॅक ट्रॅफिकची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यास सहमती दशवून, नव्या गाडीला तत्त्वतः मंजुरी दिली. त्यानुसार रेल्वेचे एडीजीएम पी. डी. गुहा यांच्याकडून ट्रेन उपलब्धता, रेल्वे ट्रॅकवरील ट्रॅफिक आणि इतर बाबींची माहिती मागविण्यात आली आहे. गुहा यांनी नवीन रेल्वे सुरू करण्यात तांत्रिक अडचण नसल्याचे सांगितले. रिलिजियस कनेक्टिव्हिटी अर्थात धार्मिक स्थळ जोडणी योजना अंतर्गत कोल्हापूर-शिर्डी अशी रेल्वे लवकरच धावू शकेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. तसेच सध्या मिरज-पंढरपूर धावणारी रेल्वे कोल्हापूरपासून सुटावी, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. त्यालाही नामदार प्रभू यांनी तत्त्वतः मंजुरी दिली आहे. दरम्यान, आठवड्यातून दोनदा कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही खासदार महाडिक यांनी केली. येत्या काही काळात साईभक्तांना कोल्हापुरातून थेट रेल्वेने शिर्डीला जाता येणे शक्य होणार आहे. बैठकीला कोल्हापूर विभागीय रेल्वे मंडळाचे सदस्य समीर शेठ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!