
कोल्हापूर- दरमहा रांगेत उभे राहून, त्यासाठी जाणे-येण्याचे पैसे खर्च करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा घरबसल्या मोबाईलद्वारे वीजबिल भरणे अत्यंत सोपे आहे. तरीही केवळ 7 टक्के ग्राहकच ऑनलाईन वीजबिल भरत आहेत. यात वाढ करण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी फोनवर मार्गदर्शन करण्याची सोय केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांनी 0231-2668079 या दूरध्वनीवर किंवा 7875769768 या मोबाईल क्रमांकावर कार्यालयीन वेळेत फोन केल्यास त्यांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासंबंधीची माहिती फोनवरच मिळणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात मिळून 18 लाख 54 हजार ग्राहक आहेत. यापैकी सरासरी एक लाख वीजग्राहक ऑनलाईन वीजबिल भरतात. हे प्रमाण 7 टक्के इतकेच आहे. जवळपास प्रत्येक घरी स्मार्टफोन व इंटरनेट पोहोचले असतानाही रांगेत उभे राहणाऱ्यांचे प्रमाण 93 टक्के इतके आहे. वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर view & pay bills online चा पर्याय उपलब्ध आहे. या शिवाय अवघ्या वर्षभरात लोकप्रिय झालेले महावितरणचे मोबाईल ॲप ॲण्ड्रॉईड, विंडोज व आयफोनच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत. या ॲपद्वारे वीजग्राहक त्याच्या एकापेक्षा जास्त वीजजोडण्या असतील तरीही एकाच खात्यातून हाताळू शकतो. त्यात त्याला वीजबिलाची माहिती, भरणा, तक्रार नोंदणी, पूर्व इतिहास, पावत्या, रिडींग नोंदणी, मोबाईल क्रमांक नोंदणी, अभिप्राय यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच ॲपद्वारे विजेसंबंधीच्या तक्रारी नोंदवणेही सोपे आहे. त्यासाठी कोणा कर्मचाऱ्याला फोन करण्याची गरज नाही.
महावितरणच्या ऑनलाईन सेवांची माहिती देण्यासाठी महावितरण वीजबिल भरणा केंद्रावर रांगेत असणाऱ्या ग्राहकांचेही मत परिवर्तन करुन त्यांच्याकडे ऑनलाईन वीजबिल भरण्याचा आग्रह धरत आहे. ग्राहकांना फोन करुनही प्रबोधन केले जात आहे. वीजबिल भरताना येणाऱ्या किरकोळ अडचणींचा विचार करुन त्या दूर करण्यासाठी महावितरणने हेल्पडेस्क सुरू केला आहे. फोन करताना ग्राहकांनी वीजबिल व एटीएम, क्रेडीट कार्ड सोबत ठेवावे जेणेकरुन सुचना ऐकून वीजबिल भरणाही करता येईल. जास्तीत जास्त ग्राहकांनी 0231-2668079 या दूरध्वनीवर किंवा 7875769768 या मोबाईल क्रमांकावर कार्यालयीन वेळेत फोन करुन माहिती घ्यावी व यापुढे ऑनलाईनच वीजबिल भरावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. किशोर परदेशी व अधीक्षक अभियंता श्री. जितेंद्र सोनवणे यांनी केले आहे.
Leave a Reply