
कोल्हापूर: कोल्हापूरचा सुपूत्र कृष्णराज महाडिक यानं इंग्लंड इथं झालेल्या बी.आर.डी.सी. ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत बाजी मारत, प्रथम क्रमांक पटकावला. तब्बल १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेय नंतर, मराठमोळ्या कृष्णराजनं भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकवलाय. कोल्हापूरसह देशभरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना, आज लोकसभेतही सभागृहाच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कृष्णराज महाडिक याचं कौतुक केलं. देशाच्या सर्वोच्च सभागृहात कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकचा गौरव होणं, नक्कीच कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे.
गेल्या काही वर्षात कुस्ती बरोबरच अनेक खेळात कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपला नावलौकीक निर्माण केलाय. नेमबाजी, जलतरण, यॉटींगसह कोल्हापूरच्या खेळाडूंनी गो कार्टिंग आणि कार रेसिंगमध्ये सुध्दा दबदबा निर्माण केलाय. रेसिंग म्हणजे वाहनचालकाचा कस पाहणारा, कौशल्य पणाला लावायला लावणारा आणि तितकाच थरारक क्रीडा प्रकार ! अत्यंत वेगाने धावणार्या गाड्या, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठीची चढाओढ आणि क्षणाक्षणाला बदलणारे विजेते अशा रोमांचक वातावरणात रेसिंग स्पर्धा पार पडतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेसिंग हा प्रतिष्ठेचा आणि तितकाच कौशल्याचा क्रीडा प्रकार आहे. अशा परिस्थितीत जेंव्हा कोल्हापुरचा युवक, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत उतरुन फॉर्म्युला थ्री सारख्या चुरशीच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावतो, तेंव्हा निश्चितच कौतुक करावे लागेल. कोल्हापूरच्या कृष्णराज धनंजय महाडिकने ही किमया साधलीय. गेली ११ वर्षे कृष्णराज कार्टिंग स्पर्धांमध्ये भाग घेवून, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहे. गो कार्टिंगमध्ये ८ वर्ष यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या ३ वर्षापासून, कृष्णराज फॉर्म्युला कार, जे. के. टायर रोटॅक्स मॅक्स राष्ट्रीय गो कार्टींग स्पर्धेसह फॉर्म्युला फोर प्रकारातही चमकदार कामगिरी करतोय. दिल्ली जवळच्या बुद्ध सर्किटवर झालेल्या बी.एम.डब्ल्यू.एफ.बी.ओ.टू. आणि एलजीबी फॉर्म्युला फोर या दोन वेगवेगळया स्पर्धेतील अंतिम फेरीतील एकूण ६ शर्यतींमध्ये, कृष्णराजनं फाईव्ह पोडियम पोझीशन पटकावले. गेल्या ११ वर्षात आपलं कौशल्य, जिद्द आणि नियोजनाच्या बळावर कृष्णराजनं बी.एम.डब्ल्यू.एफ.बी.ओ.टू. या प्रकारातही तिसरं स्थान पटकावलं. कृष्णराजच्या या उज्वल कामगिरीची दखल, आंतरराष्ट्रीय पातळीवर रेसिंगच्या वर्तुळात घेतली गेली आहे. ब्रिटीश रेसिंग ड्रायव्हर्स क्लब म्हणजे बी आर डी सी मध्ये गेल्यावर्षी कृष्णराज महाडिकचा समावेश झाला. अवघ्या एक वर्षात आपली निवड सार्थ ठरवत, कृष्णराजनं बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत नुकताच प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापुरच्या सर्किट नाईन पासून सुरु झालेला कृष्णराजचा प्रवास, राज्य आणि राष्ट्रीय सीमा पार करुन, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बी.आर.डी.सी. मध्ये विजयाची पताका फडकवत पोचलाय. नरेन कार्तीकेय या खेळाडूच्या उज्वल कामगिरीनंतर, तब्बल १९ वर्षानंतर कृष्णराजनं आंतरराष्ट्रीय रेसिंगमध्ये उत्तुंग यश मिळवत, कोल्हापूरवासीयांची मान अभिमानानं उंचावलीय. त्यामुळंच देशाच्या सर्वोच्च सभागृहात कृष्णराज महाडिकच्या यशाची दखल खुद्द सभापती सुमित्रा महाजन यांनी घेतली. संसदेमध्ये फार कमीवेळा अशाप्रकारे अभिनंदनाचा प्रस्ताव येतो. हा बहुमान कृष्णराजच्या रुपानं कोल्हापूरला लाभलाय. संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारुन, विशेष ओळख निर्माण केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ कृष्णराज महाडिकनंही आपल्या कार्याची दखल संसदेला घ्यायला लावलीय. ही केवळ क्रीडा वर्तुळासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूरसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. सभापती सुमित्रा महाजन यांनी कृष्णराजचं कौतुक करुन, कोल्हापूरच्या गुणवत्तेवरही शाबासकीची मोहोर उमटवलीय.
Leave a Reply