
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्दल सर्वप्रथम राज्य शासनाचे अभिनंदन आणि आभार ! सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून विविध उपक्रम राबवणार्या धनंजय महाडिक युवा शक्तीने, दहीहंडीचा उपक्रम गेली सात वर्षे राबवला आहे. यंदा १६ ऑगस्ट २०१७ रोजी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल ३ लाख रूपयांची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्यावतीने दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यामध्ये पाच थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये आणि सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार्या गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. दहीहंडी फोडणारा गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे.अशी माहिती आज खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दरवर्षीप्रमाणे प्रशस्त अशा दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन केले आहे. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांंसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, सार्थक क्रिएशनच्या कलाकारांचा नृत्याविष्कार आणि श्रीमंत ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण ही युवाशक्ती दहीहंडीची वैशिष्टये आहेत. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले असून, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची उपस्थिती असणार आहे.
गेली नऊ वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून युवाशक्ती दहीहंडीचा नावलौकीक आहे. तरूणाईसह आबालवृध्दांची प्रचंड गर्दी दहीहंडी सोहळ्याला होत असली, तरी अत्यंत शिस्तबध्द आणि मंगलमय वातावरणात दहीहंडीचा सोहळा पार पडतो. भारतीय संस्कृतीमधल्या भगवान श्री कृष्णांच्या बाललिलांवर आधारीत दहीहंडीचा हा उत्सव, म्हणजे सांघिक कौशल्य, खिलाडू वृत्ती, एकात्मता, शारिरीक आरोग्य, एकाग्रता आणि पारंपारिक भारतीय मुल्यांचा मिलाफ असतो. त्यामुळेच दहीहंडी सोहळ्याची लोकप्रियता वाढत असून, युवाशक्ती दहीहंडीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक गोविंदा पथके उत्सुक असतात. सर्वात जास्त रक्कमेच्या बक्षिसाची आणि सर्वात जास्त गर्दी खेचणारी युवाशक्ती दहीहंडी, यंदा कोण फोडणार, याबाबत कोल्हापुरात मोठी उत्सुकता आहे. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी बुधवार दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता जास्तीत जास्त लोकांनी दसरा चौक येथे उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक गोकुळ, बालाजी कलेक्शन आणि समृध्दी सोलर आहेत.
Leave a Reply