
कोल्हापूर: भारतात आणि त्यापेक्षाही महाराष्ट्रत अनेक सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचे प्रश्न कार्य आणि विषय यांना प्राधान्य देऊन रचनात्मक बातम्या पत्रकारांनी देणे गरजेचे आहे.वर्षानुवर्षे चालणारे राजकीय वाद,चर्चा यांचे विश्लेषण करणाऱ्या निरर्थक बातम्या देण्यापेक्षा सामाजिक विषयांवर लिखाण सध्या पत्रकारांनी करणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत आणि गेले ४० वर्षे या क्षेत्रात काम केलेले हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.जागन फडणीस शोध पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आज ते कोल्हापुरात आले होते.त्यांनी कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयास भेट दिली.त्यानंतर आयोजित वार्तालापात पत्रकारांशी त्यांनी मुक्त संवाद साधला.प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी त्यांचे स्वागत केले.
सध्या येणाऱ्या काळात ऑनलाईन जर्नालिझमला महत्व येणार आहे.त्यातच वेब जर्नालिझम मध्ये वैशिठ्यपूर्ण लिखाणाला प्राधान्य दिले जात आहे.सोशल मिडीयाचा वाढता वापर आणि जागरूकता याचा दबाव मिडीयावर आहे.एकतर्फी लेख आणि बातम्या यावर सोशल मिडीयाचा अंकुश आहे.याला आपण स्वातंत्र्याचा विस्तार म्हणू शकतो.सोशल मीडियाची सक्रियता वाढल्याने पत्रकाराला साक्षर होण्याची गरज आहे.विषयाची खोली समजावून घेतली पाहिजे.नुसत्या बातम्या आता अपेक्षित नाहीत.काश्मीर प्रश्नांवर लिहताना ३७० वे आणि ३५ अ कलम जाणून घेतले पाहिजे.युरोपमध्ये उजव्या शक्ती प्रबळ होत आहेत याचा परिणाम काय होईल,चीन आणि भारत संबंध यात अमेरिकेची भूमिका याविषयी बोलताना ते म्हणाले चीन भारत युद्धाची शक्यता कमी आहे कारण चीनला ते परवडणार नाही.बातमी दिल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा करणे गरजेचे आहे.असेही देसाई म्हणाले.
भाजपच्या सध्याचा धोरणाबद्दल बोलतना देसाई म्हणाले कोणतेही आंदोलन आपल्या बाजूने वळविणे ही कला भाजप सरकारला जमली आहे.नोटाबंदी केली,जीएसटी लावला पण विरोध झाला नाही.काळ्या पैशाची बोगस आणि खोटी आकडेवारी भाजपने दिली.पण नोटाबंदी मुळे ८० टक्के असंघटीत क्षेत्राला याचा फटका बसला आहे.विकास दर यामुळे निश्चितच कमी होणार आहे.हे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांना मारक आहे.
प्रसिद्धीत राहणाऱ्या लोकांच्या सतत बातम्या देण्यापेक्षा ही उथळता कमी करून ज्या विषयांचा समाजाला उपयोग आहे अश्यांवर विविधांगी लिखाण पत्रकारांनी करणे अपेक्षित आहे.वाचक सध्या सुजाण आहे त्यामुळे आपल्यासमोरील आव्हाने वाढलेली आहेत असेही हेमंत देसाई म्हणाले.यावेळी प्रेस क्लब संचालक,सकाळ समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार,ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.सुनील पाटील,सकाळचे पत्रकार पुरस्कार विजेते गोविंद तुपे आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
Leave a Reply