
वारणा नगर: प्रज्ञान कला अकादमीच्यावतीने अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या निवृत्त जवानांचा वंदन सोहळा आ.डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून करण्यात आला. यामध्ये रामचंद्र दत्तात्रय चव्हाण, शिवाजी बापुसो पाचींबरे,पांडुरंग यशवंत लोखंडे, कृष्णात भगवंतराव भोसले, सुभेदार मेजर विठ्ठल मरगाळे, भीमराव आकाराम निकम, बी. पाटील, कप्तान गणपतराव भगवानराव घोडके यांचा समावेश होता. त्यावेळी वीरांकडून प्रत्यक्ष युद्धातील जीवन-मरणाच्या संघर्षाचे वर्णन ऐकून रसिक, भावना विवश झाले. भारतीय समाजात सामान्य जीवन जगताना सैनिकांचा योग्य आदर होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. पारतंत्र्याचा अनुभव नसल्याने स्वातंत्र्याची किंमत नाही. देशाला राष्ट्र प्रेम शिकविण्याची गरज पडत आहे, ध्वजावंदन हे सरकारी काम होत आहे. देशप्रेम, ध्वजवंदन, राष्ट्रभक्ती ही नियम करून होणारी गोष्ट नाही, तर ती संवेदनशील मनात रुजविण्याची गरज आहे. अशी अनेक मते याप्रसंगी मांडण्यात आली. तसेच निवृत्त सैनिकांच्या मुलाखतीवर आधारित “मानवी झेंडे” हा.प्रशांत चव्हाण निर्मित माहितीपट दाखविण्यात आला. एकूण सोहळ्याविषयी बोलताना गावो गावी असे उपक्रम व्हावेत अशा शब्दात विनय कोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यावेळी प्रज्ञानचे अध्यक्ष रमेश हराळे,निलेश आवटी, रमेश चौगुले, केदार सोनटक्के,लालासो घोरपडे, मंगेश दिवान,तानाजी शिंदे,शिरीष शेवडे,विकास मिनेकर,मंगेश कांबळे,शिवकुमार कदम, सौ.नेहा आवटी,सौ.माधवी आवटी,सौ.अंबिका चौगुले,सौ.रश्मी सोनटक्के यांनी आमचे स्वातंत्र्य हे तुमचे देणे ह्या भावनेतून तमाम देशवासीयांच्या वतीने राष्ट्र्गीतावर सर्व सैनिकांना मानवंदना दिली व कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply