महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांना कायदेशीर नोटीस

 

कोल्हापूर – ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या न्यायालयात कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारा शासकीय निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध होऊन न्यायालयाने शासनाच्या आदेशावर ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी स्थगिती आणली. या याचिकेत कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची होणारी हानी संशोधन संस्था आणि पर्यावरण तज्ञ यांनी स्वतः चाचण्या करून सिद्ध केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. प्रदूषण रोखण्याचे दायित्व असतांनाही पुरोगामी संस्थांच्या नादी लागून कोणताही अभ्यास वा संशोधन न करताच कागदी लगद्याच्या मूर्तींना ‘इको-फ्रेंडली’ ठरवण्याचे कारस्थान ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि राज्याचा पर्यावरण विभाग यांनी केल्याचे न्यायालयाच्या निकालातून सिद्ध झाले. निकालानंतर १० महिने होऊनही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींमुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी कोणतीही जागृती केली नाही. इतकेच नव्हे, तर यंदाच्या गणेशोत्सवाच्या पूर्वीही त्यांनी कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणे चालू केले आहे. त्यामुळे कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार असल्याचा इशारा हिंदु जनजागृती समितीने दिला आहे. याचाच एक भाग म्हणून आज १६ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी श्री. दिलीप खेडेकर यांना हिंदु जनजागृती समितीने कायदेशीर नोटीस बजावली आहे. धर्मप्रेमी श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी ही नोटीस बजावली असून ‘पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि धर्मशास्त्रसुसंगत उत्सव व्हावा, यासाठी कायदेशीर मार्गाने लढा देत आहे’, असे मत श्री. ज्ञानेश्‍वर अस्वले यांनी व्यक्त केले.
संशोधन संस्था, पर्यावरण तज्ञ यांसह न्यायालयानेही कागदी लगद्याची मूर्ती प्रदूषणकारी असल्याचे सांगूनही कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारे ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला आतातरी कळले पाहिजे. या पुरोगाम्यांना पर्यावरणाचे काही पडले नसून हिंदूंच्या धार्मिक विधींवर बंदी आणण्यासाठी पर्यावरण रक्षणाचा मुखवटा लावायचा होता, हेच स्पष्ट होत आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही शाडूच्या मातीच्या मूर्ती बसवण्याचे आवाहन केले आहे. त्याला तरी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’, पर्यावरण विभाग आणि महानगरपालिका प्रशासन प्रतिसाद देईल का, असा प्रश्‍नही समितीने केला. हिंदु जनजागृती समितीचे आवाहन ! : पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली श्री गणेशमूर्ती घ्या. या मूर्तीमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. यातून पर्यावरणरक्षण आणि धर्मशास्त्राचे पालन या दोन्ही गोष्टी साध्य होतील. ‘कृत्रिम हौद’, ‘अमोनियम बायकार्बोट्रेटमध्ये विसर्जन’, ‘मूर्तीदान’ आदी धर्मविरोधी पद्धतींवर बहिष्कार घालावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!