
कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव शांततेत,डॉल्बीमुक्त, उत्साहात आणि विधायक उपक्रमांनी साजरा करुया, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांचे समुपदेशन करण्यास प्रयत्नशील राहू.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत कोल्हापूर शहरातील श्री गणराया पुरस्काराचे वितरण येथील धैर्यप्रसाद हॉल येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समारंभास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर हसिना फरास,आमदार राजेश क्षीरसागर,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, उपमहापौर अर्जुन माने, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात गणराया पुरस्काराचे सर्वसाधारण विजेतेपद लेटेस्ट तरुण मंडळ, मंगळवार पेठ, यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
उत्सवकाळातील डॉल्बीच्या वापराबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होऊ नये याची सर्व मंडळांनी काळजी घ्यावी. तसेच डॉल्बी मुक्त वातावरणात व विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉल्बीमुक्तीसाठी बहुतांशी सर्वच मंडळांनी उत्स्फुर्त सहकार्य केले आहे, मात्र जी गणेश मंडळे यास अपवाद ठरली आहेत, त्यांच्यासाठी आपण स्वत: आणि विशेष पोलीस महानिरीक्षक या मंडळांसोबत समुपदेशन करुन डॉल्बीचे परिणाम- दुष्परिणाम याची माहिती देणार आहोत. या उपक्रमास ही मंडळे निश्चितपणे सहकार्य करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त् केली.
शहर तसेच जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी अधिकाधिक विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पैशावाचून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे, पैशावाचून रुग्ण सेवेपासून वंचित राहिलेल्या रुग्णांना रुग्ण सेवा उपलब्ध करुन देणे तसेच पैशावाचून खेळापासून वंचित राहिलेल्या खेळाडूंना खेळाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणे असे विधायक उपक्रम राबविण्यामध्ये सर्वच मंडळांनी पुढे येणे गरजेचे आहे. जेणेकरुन परिसरातील जनतेला गणेश मंडळ आपलेसे वाटावे.
Leave a Reply