पत्रकारांनी लोकशाहीचा रक्षक म्हणून काम केले पाहिजे: अॅड उज्वल निकम

 

कोल्हापूर: जनतेचा विश्वास हा न्यायालय आणि लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसारमाध्यमांवर असतो.पत्रकार एखाद्या न्यायालयीन खटल्याचे वृत्तांकन करत असेल तर लोक त्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे वकील,पत्रकार आणि न्यायालय यांच्यातील संबंध मधुर असणे तर गरजेचे असतेच पण न्यायालयातील कुठल्या गोष्टींचे वृत्तांकन करावे आणि कशाचे करू नये याचे भान राखण्यासाठी पत्रकारांनी न्यायालयाच्या अवमान कायद्याचा अभ्यास करणे गरजेचे असते.जर न्यायाधिश चुका करत असेल तर त्याविरोधातही लोकशाहीचा रक्षक म्हणून पत्रकाराने आपले लिखाण केले पाहिजे.सत्य मारले न जाता लेकी बोले सुने लागे अश्या पद्धतीने वृत्तांकन करणे हीच खरी पत्रकारिता आहे असे उद्गार अॅड उज्वल निकम यांनी काढले.कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी मुक्त संवाद साधला.न्यायालयीन प्रक्रियेतील दोन्ही बाजू समोर आल्या पाहिजेत.कारण कायद्यानुसार एखादी व्यक्ती तोपर्यंत निर्दोष असते जोपर्यंत तिच्यावर गुन्हा दाखल होत नाही.याची खबरदारी पत्रकारांनी घेतली पाहिजे.न्यायालयीन प्रक्रिया जनतेपर्यंत पोचविण्याचे काम प्रसारमाध्यम करतात.यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते.पत्रकाराच्या हातात प्रभावी शस्त्र आहे.लोकांचा त्यांच्या लिखाणावर विश्वास असतो.त्यामुळे वकीलांप्रमाणे पत्रकारालाही आपल्या बातमीचा काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे आहे म्हणूनच पत्रकारांसाठी न्यायालयीन अवमान कायद्याची माहिती असणे तसेच न्यायालयाची अप्रतिष्ठा होणार नाही याची खबरदारी घेणे महत्वाचे ठरते.सोशल मिडीयावरील अफवांना थांबविण्याचे काम अप्रत्यक्षपणे प्रसारमाध्यमे करू शकतात.भविष्यात आपल्याला वेगळ्या मार्गाने जावे लागेल.परिस्थिती स्फोटक बनत आहे.
पाकिस्तानामधील भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी मत व्यक्त करताना ते म्हणाले “अंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वकिलांना त्यांच्या बाजूने लढण्याची परवानगी दिली पाहिजे”.पाकिस्तानने हेतू पुरत्स्तर त्यांना खोट्या आरोपाखाली अडकविले आहे.प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी अॅड उज्वल निकम यांचे स्वागत केले.यावेळी उपाध्यक्ष तानाजी पोवार,सचिव विकास पाटील,प्रेस क्लब संचालक आणि सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधी,छायाचित्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!