
कोल्हापूर: कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे प्रश्न आणि समस्या प्राधान्य क्रमाने सोडविल्या जातील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल- हातकणंगले यांच्या सभागृहात पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आयेाजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. बैठकीस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल- हातकणंगले अर्थात मॅकचे अध्यक्ष संजय जोशी, उपाध्यक्ष गोरख माळी, सचिव श्री. धोत्रे, माजी अध्यक्ष मोहन कुशिरे यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उप अभियंता एस.व्ही.अपराध, क्षेत्र व्यवस्थापक प्रदीप सामंत, सहाय्यक अभियंता ई.जी.पाटील, सर्व्हेअर सुसेन कापरे आदीजण उपस्थित होते.
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने करण्याबाबत एमआयडीसीला निर्देश देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मुख्य व अंतर्गत रस्त्यांसाठी एमआयडीसीने अंदाजपत्रक तयार करावे, त्यानुसार पाठपुरावा करुन आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न केले जातील. तसेच लक्ष्मी टेकडी चौकात उड्डाण पुल बांधण्याच्या मागणीबाबत संबंधित यंत्रणेशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी एमआयडीसीने जागा उपलब्ध करुन द्यावी तसेच या औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणे व अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी एमआयडीसी आणि पोलीस दलाने आवश्यकत्या उपयायोजना करण्याची सूचना करण्याची सूचना करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पंचतारांकित औद्योगिक वसाहत क्षेत्रातील चौकांचे सुशोभिकरणाचे काम केएसबीपीच्या माध्यमातून हाती घेतले जाईल. या औद्योगिक क्षेत्रासाठी पोलीस स्टेशन मंजूर झाले असून त्यासाठी एमआयडीसीने 20 गुंठे जागा उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी अद्ययावत पोलीस स्टेशन उभारण्याबाबत निश्चितपणे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने विकासवाडी येथे नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याचा एमआयडीचा प्रस्ताव असून या प्रस्तावाला गती देवून विकासवाडी एमआयडीसीसाठी शासनाची उपलब्ध असलेली जमीन देण्याबरोबरच अन्य जमीनही उपलब्ध करण्याबाबत एमआयडीसीने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करुन फाँड्री व्यवसायला सहाय्यभूत ठरणारा इंजिनिअरिंगचा मोठा उद्योग आणण्याबाबत प्रयत्न केले जातील. याकामी पंचतारांकित औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योजकांनी सक्रीय पुढाकार घेणे, गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
Leave a Reply